कुख्यात गुंडाचं थेट मंत्रालयातून रील; VIDEO पोस्ट करत वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:35 PM2024-02-06T13:35:19+5:302024-02-06T13:35:38+5:30
व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
Congress Vijay Wadettiwar ( Marathi News ) : उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही विविध गुन्हेगारांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या सगळ्या घडामोडींमुळे सरकार कोंडीत सापडलेले असतानाच पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवाळ याने मंत्रालय परिसरात व्हिडिओ शूट केला असून हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
सरकारवर निशाणा साधत विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, " गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तसंच या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"हीच का ती मोदी की गॅरंटी?"
मंत्रालयात कुख्यात गुंडाने केलेल्या रीलनंतर विजय वडेट्टीवार यांनी काही उदाहरणे देत सरकारला लक्ष्य केलं. "महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटीविरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती 'मोदी की गॅरंटी'?" असा खोचक सवाल वडेट्टीवारांनी विचारला आहे.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर… pic.twitter.com/vjih1SkiFW
दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत गुंडांनी काढलेल्या फोटोवरून सरकारला घेरत विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की, "निवडणुकांआधी महायुतीत गुंडांची भरती जोरात. निवडणुकीपूर्वी सत्तेतील तीनही पक्षात स्वतःची गँग मजबूत करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा. मुख्यमंत्री पुत्राची वर्षा बंगल्यावर हेमंत दाभेकरशी भेट. मुख्यमंत्र्यांची निलेश घायवाळसोबत भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आसिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढीशी भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची गजा मारणेशी घरी जाऊन भेट. गुंडांचे आदरतिथ्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून जनतेने कायदा व सुव्यवस्थेची अपेक्षा कशी करावी?" असा हल्लाबोल त्यांनी केला होता.