वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून विसर्जन, गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 06:17 AM2018-09-23T06:17:02+5:302018-09-23T06:17:26+5:30
वेसावे कोळीवाड्याची गणेश विसर्जनाची एक आगळी वेगळी परंपरा आहे. येथे शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा जपली जात आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - वेसावे कोळीवाड्याची गणेश विसर्जनाची एक आगळी वेगळी परंपरा आहे. येथे शिपील (छोट्या बोटी)च्या तराफ्यातून विसर्जनाची आगळी वेगळी व देखणी परंपरा जपली जात आहे. मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने लहान मूर्तीपासून ते मोठ्या गणेशमूर्तींचे खोल समुद्रात विसर्जन केले जाते. नेत्रदीपक विसर्जन सोहळा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात एकमेव असा विसर्जन सोहळा असल्याचा दावा मांडवी गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पंकज जोनचा व सचिव वीरेंद्र मासळी यांनी केला आहे.
गणपती विसर्जनाची वेसावकरांची जुनी परंपरा आहे. १९९५ पूर्वी येथील बाजार गल्ली कोळी जमातीतर्फे गणपती विसर्जन केले जात होते. मात्र, १९९५ पासून येथील मांडवी गल्ली कोळी जमातीच्या वतीने पाच, सात दिवसांचे सुमारे २५ ते ३० गणेशमूर्ती आणि अनंत चतुर्थीला पश्चिम उपनगरातील सुमारे १२५ गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जनासाठी चार शिपीलचा एक तराफा केला जातो. येथील विसर्जनाला असे एकूण तीन तराफे सज्ज असतात. विसर्जनासाठी सज्ज असलेल्या ताराफ्यावर मधे फळी ठेऊन गणपतीची मूर्ती ठेवली जाते. मग वेसावे येथील खोल समुद्रात फळीवरील ठेवलेल्या गणेशमूर्तीला कोणताही धक्का न लागता विसर्जन केले जाते. जमातीचे सुमारे तीनशे कार्यकर्ते येथील विसर्जन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटत असतात. दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत सुमारे २४ तास येथील विसर्जन सोहळा सुरूच असतो, अशी माहिती मांडवी गल्ली कोळी जमातीचे उपाध्यक्ष जगदीश भिकरू व खजिनदार नरेश कोळी यांनी दिली.
फेरीबोटीचा हजारो भाविकांना फायदा
वेसावे ते मढ जेट्टी दरम्यान ४ मे २०१५ रोजी १६ सीटर आरामदायी फेरीबोट सेवा मांडवी गल्ली कोळी जमातीने सुरू केली होती. मात्र, कस्टमच्या अधिकाºयांमुळे ३० जून, २०१५ साली ही सेवा बंद झाली होती. त्या वेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपळ शेट्टी यांनी आणि येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भावे यांनी सहकार्य केल्यामुळे, अखेर २५ डिसेंबर, २०१५ पासून पुन्हा सुरू झालेल्या येथील आरामदायी फेरीबोट सेवेला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा अविरत सकाळी ६.३० ते रात्री ११.८० पर्यंत सुरू असून, याचा लाभ रोज सुमारे दोन हजार प्रवासी घेत असल्याची माहिती जमातीचे पंकज जोनचा व वीरेंद्र मासळी यांनी दिली.