मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनानंतरच?, अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:13 AM2023-07-13T11:13:03+5:302023-07-13T11:14:20+5:30
आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे.
मुंबई - राज्यात सध्या मंत्रिपदाच्या खातेवाटपाची जोरदार चर्चा आहे. भाजपा-शिवसेना सरकारमधील अनेक आमदारांनी मंत्रिपदाची अपेक्षा असतानाच, अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, मंत्रिपदाची शर्यत अधिकच तीव्र झाल्याचे दिसते. बुधवारी काही आमदारांना मुंबईला बोलावण्यात आले होते. पण, काल आमदार बच्चू कडू मुंबईहून स्वगृही परतले. त्यानंतर, आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडल्याची चर्चाही आता जोर धरू लागली आहे.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडल्याचे समजते. केवळ, खाते वाटपावार आज किंवा उद्या निश्चितपणे अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला आणखी वेट अँड वॉचच्या भूमिकेत जावे लागेल. उपमुख्यमंत्रीअजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच, सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून तत्पूर्वी विस्तार होणार असल्याची चर्चा होती. पण, आता अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याचे समजते. त्यामुळे, शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारण, शिंदे गटातील काही नेते मंत्रिपदासाठी गुडग्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आमदार भरत गोगावले आणि आमदार संजय शिरसाट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होईल, असे विश्वासाने सांगितले जात आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हे वृत्त फेटाळले आहे. माझ्या ऑफ लाईन माहितीच्या आधारे मंत्रिमंडळ विस्तार उद्या होईल. अर्थात, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अंतिम निर्णय घेतील असे शिरसाट यांनी म्हटलं आहे.