Opinion Poll: आत्ता निवडणूक झाल्यास पुन्हा मोदी सरकार, पण ६० जागा घटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 08:49 PM2018-10-04T20:49:56+5:302018-10-04T21:30:22+5:30
२०१४ मध्ये २८२ जागांवर 'कमळ' फुलवून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी २४८ जागांपर्यंत मजल मारता येईल आणि त्यांच्या मित्रपक्षांना २८ जागा मिळतील...
मुंबईः वाढती महागाई, घसरता रुपया, बेरोजगारी, हतबल शेतकरी, राफेल करार या मुद्द्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सगळेच विरोधक करत असले, तरी जनतेचा कल मोदींकडे - एनडीएकडेच असल्याचं एबीपी वृत्तसमूहाने सी-व्होटरसोबत केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे.
आत्ता लोकसभेची निवडणूक झाल्यास काँग्रेसप्रणित यूपीएला एकूण ५४३ जागांपैकी ११२ जागा (२५.४ टक्के मतं) मिळतील, तर भाजपाप्रणित रालोआ २७६ जागांपर्यंत (३८.२ टक्के मतं) पोहोचेल, असं चित्र दिसतंय. म्हणजेच २७२ ची मॅजिक फिगर ते पार करताहेत. पण, गेल्या निवडणुकीत रालोआनं ३३६ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच, यावेळी त्यांना ६० जागांचा फटका बसू शकतो. दुसरीकडे, ३६.४ टक्के मतं मिळवून अन्य पक्ष १५५ जागांपर्यंत मुसंडी मारू शकतात.
भाजपा आणि काँग्रेसचा विचार केल्यास, २०१४ मध्ये २८२ जागांवर 'कमळ' फुलवून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला यावेळी २४८ जागांपर्यंत मजल मारता येईल आणि त्यांच्या मित्रपक्षांना २८ जागा मिळतील, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याउलट, गेल्या निवडणुकीत ४४ जागांवरच समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला दुप्पट यश मिळेल. ते ८३ जागांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे मित्र ३२ जागा मिळवतील, असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भाजपाने 2014 ची लोकसभा निवडणूक लढविली होती. मोदी सरकारला गेल्या चार वर्षात विरोधकांनी अनेक मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच, वाढत्या महागाईमुळे जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला असला तरी सुद्धा मोदी यांची जादू कायम असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थीती अशीच कायम राहिल्यास 2019 मध्ये सुद्धा देशातील जनतेचा कौल पुन्हा कमळालाच मिळण्याची शक्यता आहे.