विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!

By यदू जोशी | Published: April 19, 2024 05:46 AM2024-04-19T05:46:00+5:302024-04-19T05:48:01+5:30

आधी केला ज्यांचा विरोध, आज त्यांचा प्रचार करण्याची वेळ 

Opponents became friends, comrades became enemies First protest now time to promote! | विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!

विरोधक झाले मित्र, सोबतीच झाले शत्रू; आधी विरोध आता प्रचार करण्याची वेळ!

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: राज्याच्या राजकारणात अनेक गमतीशीर गोष्टी बघायला मिळत आहेत. गेल्या पाच वर्षांत राजकीय पक्षांच्या जोड्या अशाकाही बदलल्या की २०१९ मध्ये ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांना विजयी करण्याचे आवाहन आता करावे लागत आहे. गेल्यावेळी ज्यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक केले त्यांना पाडण्यासाठी आता अहोरात्र मेहनत सुरू आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पराभव केला, तेव्हा अर्थातच अजितदादा हे पार्थसाठी झटत होते. 

आता बारणे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि अजित पवार यांना त्यांच्या विजयाचे आवाहन करावे लागत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमध्ये सुनील तटकरेंवर गेल्यावेळी हल्लाबोल केला होता, आता ते त्यांचा प्रचार करताना दिसतील. 

बदललेल्या राजकारणाने बाजू अशा बदलल्या
माढा मतदारसंघ

- २०१९ मधील स्थिती - भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर कोण होते? - विजयसिंह मोहिते पाटील, शहाजीबापू पाटील, जयकुमार गोरे, नारायण पाटील, उत्तम जानकर, प्रशांत परिचारक.
- २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदेंसोबत कोण होते? - गणपतराव देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, बबनदादा शिंदे, रश्मी बागल, प्रभाकर देशमुख.
- यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांसोबत कोण आहेत? - बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील, शिवाजी सावंत, प्रशांत परिचारक, रश्मी बागल, राम सातपुते.
- यावेळी धैर्यशील मोहितेंसोबत कोण? - विजयसिंह मोहिते पाटील, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, उत्तम जानकर, रघुनाथराजे निंबाळकर.

ज्यांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले... 
बुलढाण्यात गेल्यावेळी प्रतापराव जाधव शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नेते सरसावले होते, यावेळी जाधव हे शिंदेसेनेत आहेत आणि त्यांना हरविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या. 
२०१९ मध्ये साताऱ्यात उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि शरद पवारांनी त्यांच्या विजयासाठी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली. आता तेच उदयनराजे भाजपचे उमेदवार आहेत. पवार आता त्यांच्या विरोधात सभा घेतील. 
अमरावतीत भाजपच्या आताच्या उमेदवार नवनीत राणा २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थित उमेदवार होत्या आणि दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते त्यांच्या प्रचारात उतरले होते. आता त्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि तेच नेते आता विरोधात प्रचाराला उतरले आहेत. 
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ज्या प्रताप पाटील चिखलीकरांविरुद्ध हरले त्याच चिखलीकरांच्या (भाजप) प्रचाराची कमान आता चव्हाण यांनी सांभाळली. 
शिरूरमध्ये डाॅ. अमोल कोल्हे गेल्यावेळी राष्ट्रवादीचे होते तेव्हा त्यांच्या विजयासाठी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते भिडले होते. कोल्हेंनी पराभव केलेले शिवाजीराव अढळराव पाटील (तेव्हा शिवसेना) हे आता अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. 

बीडमध्ये अशा बदलल्या बाजू

  1. - भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंसोबत आज कोण? - खा. प्रीतम मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. नमिता मुंदडा, लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, अमरसिंह पंडित.
  2. - शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासोबत कोण? - खा. रजनी पाटील, आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री बदामराव पंडित.
  3. - २०१९ मध्ये भाजपच्या प्रीतम मुंडेंसोबत कोण होते? - पंकजा मुंडे, आ.लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे,  (माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यावेळी राष्ट्रवादीत होते; पण त्यांनी प्रीतम मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता, यावेळी ते सक्रिय नाहीत.)
  4. - २०१९ मध्ये प्रीतम यांच्या विरोधात उभे असलेले बजरंग सोनवणेंसोबत कोण होते? - रजनी पाटील, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, अक्षय मुंदडा, संदीप क्षीरसागर.

Web Title: Opponents became friends, comrades became enemies First protest now time to promote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.