Maratha Reservation: राजीनामा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद; ओबीसींची नाराजी कशी रोखायची?
By अतुल कुलकर्णी | Published: July 31, 2018 02:20 AM2018-07-31T02:20:27+5:302018-07-31T06:33:56+5:30
मेगा भरतीस मोर्चे काढणाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील तरुणांची मोठी नाराजी येण्याच्या भीतीने काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणावर कोणती भूमिका घ्यावी यावर काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे. राजीनामे देऊन दबाव निर्माण करावा या भूमिकेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व काही नेते आहेत तर यामुळे सरकारला मोकळे रान मिळेल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे मत आहे. दुसरीकडे मेगा भरतीस मोर्चे काढणाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातील तरुणांची मोठी नाराजी येण्याच्या भीतीने काँग्रेसची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
सोमवारी काँग्रेसच्या बैठकीत दोन परस्परविरोधी मते पुढे आल्याने दिल्लीशी बोलणे झाले. पुन्हा रात्री उशिरा काँग्रेसची बैठक झाली. या सगळ्या प्रकारात ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील तरुणांच्या नाराजीचा फटका मराठा आमदारांना बसेल. त्यावर कशी मात करायची यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतशी बोलताना सांगितले. आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्टÑाला देशाच्या राजकीय अस्वस्थतेचे केंद्र बनवायचे अशा हालचाली काही नेत्यांनी सुरु केल्या आहेत. कोणत्याही स्थितीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर मांडायला व नंतर स्वीकारण्यास भाग पाडायचे, एकदा का राज्याने अहवाल स्वीकारला की तोच आधार घेत देशभरात ज्या ज्या राज्यात आरक्षणाची मागणी पुढे येत आहे तेथे हीच भूमिका पुढे न्यायची आणि भाजपा सरकार आरक्षण विरोधी आहे असे चित्र देशात तयार करायचे अशी रणनिती काँग्रेसने आखल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सकारात्मक असेल असे गृहित धरुन हे नियोजन केले जात आहे.
दरम्यान, मेगा भरतीस विरोध केल्यामुळे ओबीसीसह कायद्याने आरक्षण लागू असणाºया घटकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे, शिवाय खुल्या प्रवर्गातील जागाही त्यामुळे भरण्यास अडचण होत आहे यामुळे समाजातील अन्य घटकांच्या नाराजीवर काय उपाय करायचे असा विषयही बैठकीत चर्चेला गेला. अनेकांनी आपण फक्त मराठा मतांवर निवडून येत नाही तर अन्य समाजाशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे आपण निवडून येतो, तेव्हा त्यांना नाराज कसे करणार? अशी चर्चाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये पसरली आहे.
आॅगस्टमध्ये ओबीसींचे मोठे संमेलन मुंबईत होत आहे. त्यांच्यावतीने ही सरकारवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु आहेत.