'...म्हणून आज ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आले'; अजित पवारांचं विधान अन् काही क्षणातच राडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:12 PM2022-08-24T13:12:55+5:302022-08-24T13:17:31+5:30
विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे.
मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार राड्यानं झाली आहे. ज्या विधानभवनात राज्याच्या जनतेसाठी कायदे आणि निर्णय घेतले जातात त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. सदर प्रकरण घडण्याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.
...तर यापेक्षाही मोठा राडा घालू; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा
गोंधळाच्या काहीच मिनिटं आधी बोलताना अजित पवार म्हणाले की, ५० खोके, एकदम ओक्के ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली की ते नाराज झालेले दिसत आहेत. यामुळंच त्यांच्यातील काही आमदार आज विधिमंडळातील पायऱ्यांवर आलेत. त्यांच्या या वागण्यानं हे निष्पन्न झालं आहे की, त्यांच्या विरोधात दिलेल्या घोषणा त्यांच्या मनाला लागल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले होते.
'अरे हट्ट...त्यांनी नाही आम्हीच धक्काबुक्की केली'; आम्ही घाबरणारे नाही, भरत गोगावलेंचा इशारा https://t.co/ecZ8KaWEte
— Lokmat (@lokmat) August 24, 2022
दरम्यान, विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गटातील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही गटातील आमदारांमध्ये शाब्दीक बाचाबाजी झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं.