'दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 07:55 PM2020-01-09T19:55:26+5:302020-01-09T19:56:12+5:30
मनसेने आपला विचार आणि कार्यपद्धती बदलली, ती आणखी व्यापक केली तर भविष्यात काहीही होऊ शकतं.
मुंबई - राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा नेत्यांची चिंतन बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटावे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाची चिंतन बैठक संपली, ही बैठक यापूर्वीच ठरली होती. यामध्ये जिल्हा परिषदेच्या निकालांवरही चर्चा झाली. जिल्हा परिषदेत भाजपाने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. तीन पक्ष एकत्र येऊन देखील महाराष्ट्रात भाजपा नंबर १ आहे हे सिद्ध झालं आहे. जनता आमच्या पाठिशी आहे हे यातून सिद्ध होतं. पुढील राजकीय रणनीती काय आखायची याबाबत ठरवलं जाणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच नागपूर जिल्हा परिषदेत झालेल्या पराभवावर बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वेळी शिवसेना-भाजपा एकत्र निवडणुका लढवत होत्या, यंदा शिवसेना-भाजपा यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर राष्ट्रवादी-काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली. यात आमच्या ६ जागा कमी झाल्या तर शिवसेनेच्या ७ जागा कमी झाल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ६ पैकी २ जागा आमच्या आल्या होत्या. त्याचा परिणामही जिल्हा परिषद निवडणुकीवर झाला असल्याचं त्यांनी सांगितले.
सध्यातरी मनसेसोबत युती नाही
मनसेने आपला विचार आणि कार्यपद्धती बदलली, ती आणखी व्यापक केली तर भविष्यात काहीही होऊ शकतं. सध्यातरी त्यांचे विचार आणि धोरण आमच्या राष्ट्रीय पक्षाच्या विरोधात आहे. सर्व समाज, विविध भाषातील लोकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं राजकारण आमचं आहे. त्यामुळे ही भूमिका मनसेला व्यापक करावी लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.