ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय एल्गार; 21 ऑगस्टला मुंबईत भव्य मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:06 PM2019-08-02T12:06:45+5:302019-08-02T12:21:44+5:30
मतदाराने केलेल्या मतदानाबाबत संशय आहे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्या ही आमची एकमुखी मागणी आहे
मुंबई - ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत येत्या 21 तारखेला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वांद्रे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात ईव्हीएम मशीनवर संशय घेणारं वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकीआधी सत्ताधारी पक्षाकडून जागांचे आकडे सांगितले जात आहे. इतका विश्वास त्यांच्याकडे आला कुठून? त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याला वाव मिळत आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. चिप अमेरिकेत बनते मग त्यावर संशय घेता येणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
EVM विरोधी आंदोलनात भाजपा-शिवसेनेनेही यायला हवं - राज ठाकरे @RajThackeray#EVMhttps://t.co/fmRmnEZyy3
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2019
या सर्वपक्षीय मोर्चापूर्वी राज्यातील नागरिकांना एक फॉर्म देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करण्यात येईल. जे लोक हे फॉर्म भरतील त्यांचे नाव, नंबर, पत्ता असं सगळं भरुन घेतलं जाणार आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पुढील काही दिवस ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे सगळे फॉर्म गोळा करुन 21 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढला जाईल. लोकांकडून गोळा केलेले हे सगळे फॉर्म महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांना देण्यात येतील अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तसेच मुंबईतील मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ईव्हीएममुळे शंकेला वाव मिळतो, मतदाराने केलेल्या मतदानाबाबत संशय आहे आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्या ही आमची एकमुखी मागणी आहे. निवडणुका पारदर्शकपणे व्हाव्यात, यासाठी सर्वपक्षीयांनी एक भूमिका घेतली आहे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली तर हा पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहीजे, 21 तारखेचा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितले.