लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक; गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:50 PM2023-06-15T15:50:29+5:302023-06-15T15:52:11+5:30
गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे.
मुंबई : मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर एका धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे.
या घटनेचा युद्धपातळीवर तपास पूर्ण करुन सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती? याला कोण जबाबदार आहे? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थीनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मुंबईत लोकलच्या हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये सकाळच्या वेळेत विद्यार्थीनीवर अत्याचाराची घटना घडली. परीक्षेला जात असताना विद्यार्थीनीसोबत सकाळी साडे सातच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी लोकल ट्रेन सुरू होताच महिलांच्या डब्यात चढला आणि तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणी ट्रेनमधून उतरली आणि तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आठ तासांत आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीचे नाव नवाज करीम असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.