पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 05:33 IST2025-03-03T05:31:15+5:302025-03-03T05:33:21+5:30
कला अकादमी पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज

पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : कोणत्याही शहराचे सांस्कृतिक वैभव हे तिथल्या इमारतींमध्ये नसते, तर सभ्यता आणि संस्कृतीमध्ये असते. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव हे इथल्या कलावंतांमध्ये दडलेले आहे आणि पु. ल. देशपांडे हा महाराष्ट्राचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ आहेत, असे गाैरवाेद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काढले.
प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कलाअकादमीच्या नूतनीकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पु. ल. देशपांडे यांच्या नावाने सुरू असलेल्या या अकादमीत आता खूप चांगल्या सुविधा निर्माण करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी डबिंग, रेकॉर्डिंग, उत्तम प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ज्यांना काम करायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप सुंदर ठिकाण आहे.
रवींद्र नाट्यमंदिरच्या नूतनीकरणांमध्ये खूप चांगल्या सुधारणा करण्यात आल्याने अद्ययावत असे नाट्यगृह तयार झाले आहे. एकेकाळी या नाट्यगृहाच्या ग्रीन रूममध्ये मोठ्या पाहुण्यांना बसविण्याची सोय नव्हती, मात्र आताची ग्रीन रूम खूप छान झाली आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी घंटा वाजवली : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्र्यांना घंटा वाजवायला लावली. इतर वेळेस जेव्हा आपण म्हणतो की मी काय इथे घंटा वाजवायला आलोय का? तर आज प्रत्यक्षात त्यांनी घंटा वाजवली, असे मिश्किल विधान पवार यांनी केले.
नाट्यमंदिरे सुसज्ज करणार
राज्यातील छोट्या नाट्यमंदिरांची अतिशय दुरवस्था झाली आहे. ती सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबत आपण सांस्कृतिक कार्यमंत्र्यांमार्फत प्रस्ताव पाठवणार आहोत. तो अर्थमंत्र्यांनी स्वीकारावा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.