विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज नाही - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 10:19 AM2019-07-31T10:19:38+5:302019-07-31T10:23:12+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते आज भाजपात प्रवेश करत आहेत.
मुंबई - विविध पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात असताना पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असं बोललं जात आहे मात्र असं काही होत नाही. जे लोक नाराज आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. जे लोक प्रवेश करत आहेत त्यांची सामाजिक आणि राजकीय ताकद पाहूनच पक्षप्रवेश दिला जात आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. गणेश नाईक यांच्या पक्षप्रवेशावरुन भाजपाच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे नाराज नाहीत असंही त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते आज भाजपात प्रवेश करत आहेत. कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, गणेश नाईक, संदीप नाईक, चित्रा वाघ अशा नेत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढच्या आठवड्यात आणखी पक्ष प्रवेश होणार आहेत. प्रवेश करणाऱ्या नावांची छाननी करून निवड करावी लागते. कोणत्याही कार्यकर्त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. त्यांची समजूत काढण्यात येईल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 13 शिवसेनेचे मंत्री सोडले, तर 30 मंत्री हे भाजपामधलेच आहेच. विखे-पाटील सोडले तर सर्व भाजपाचे कार्यकर्तेच मंत्री झालेले आहेत. इथे असणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी अन्याय झाला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. प्रवेश करणाऱ्या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाचा हा ‘मेगा शो’ ठरण्याची शक्यता आहे. आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे नेत्यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे विरोधकांना चांगलाच धक्का बसला आहे.