पाटील यांचे पालकमंत्रिपद जाणार?; राष्ट्रवादीमुळे भाजप-सेनेच्या मंत्र्यांवर अदलाबदलीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 06:45 AM2023-07-04T06:45:34+5:302023-07-04T06:46:13+5:30
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन हे तेथे पालकमंत्री होते.
मुंबई : राष्ट्रवादी हे तिसरे भावंडं भाजप-शिवसेना युतीसोबत आल्याचा फटका काही पालकमंत्र्यांना बसू शकतो. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातले. २०१९ मध्ये ते पुण्यातून विधानसभेची निवडणूक जिंकले. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपद मिळाले. आता पालकमंत्रिपद अजित पवार यांना मिळाले तर चंद्रकांत पाटील यांना अन्य जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले जाईल.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही राजी-नाराजी होऊ शकते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन हे तेथे पालकमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्याकडे गेले. या सरकारमध्ये ते दादा भुसे यांच्याकडे आहे. मात्र आता भुजबळ मंत्री झाल्यानंतर पालकमंत्रिपद भुसेंकडेच राहते की भुजबळ यांना मिळते याबाबत उत्सुकता असेल.
कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हे शंभूराज देसाई (शिंदे गट) यांच्याकडे आहे. पण आता त्याच जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ मंत्री झाल्याने तिथे शिंदे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असेल. धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तिथे अतुल सावे सध्या पालकमंत्री आहेत. सावे यांच्याकडे जालना जिल्ह्याचेही पालकमंत्रिपद आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटील हेच पालकमंत्रिपदी कायम राहतील की राष्ट्रवादीचे अनिल पाटील येतील याचा फैसलादेखील होईल.