इतिहास उगाळण्यापेक्षा खात्याकडे लक्ष द्या; आव्हाडांना काँग्रेसचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 05:07 AM2020-01-31T05:07:58+5:302020-01-31T05:10:06+5:30
मी इंदिरा गांधींना आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे. इंदिरा गांधी यांचा समर्थक आहे आणि हे सांगायला मला लाज वाटत नाही, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.
मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याबद्दल आणीबाणीच्या संदर्भात केलेल्या विधानावर कॉँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाडांनी इतिहासातील घटनांवर भाष्य करण्याऐवजी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला काँग्रेसने दिला आहे.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आव्हाड यांनी बीड येथील एका कार्यक्रमात केला होता. यावरून गदारोळ उठल्यानंतर गुरुवारी सावरासावर करत आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
मी इंदिरा गांधींना आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे. इंदिरा गांधी यांचा समर्थक आहे आणि हे सांगायला मला लाज वाटत नाही, असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले.
महाविकास आघाडीचे सरकार चालवताना सरकारमध्ये बसलेल्या आणि बाहेरच्या नेत्यांनीसुद्धा बोलताना संयम बाळगायला हवा, असे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी म्हटले आहे.
आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. मात्र, यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.
देशाची एकता आणि अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या इंदिरा गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित असल्याचे चव्हाण
म्हणाले. आव्हाड यांचे विधान आक्षेपार्ह असून अशा वक्तव्यांपासून त्यांनी दूर राहायला हवे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी
अशी वक्तव्ये टाळावीत, असे
काँग्रेस प्रवक्ते चरणसिंग सप्रा
म्हणाले.
त्यांनी तारतम्य ठेवावे - सत्तार
जितेंद्र आव्हाड यांनी आणीबाणीसंदर्भात स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी सतार यांनी कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्याविषयी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे, असे सांगून सत्तार यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला.
आव्हाड यांना काय सल्ला देणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सत्तार यांनी आव्हाड यांनी शिर्डीला जावे तसेच श्रद्धेबरोबरच सबुरीचा सल्ला दिला.