आधी पाच लाख रुपये भरा; मग याचिकेवर सुनावणी घेऊ, आशिष शेलारांना हायकोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:07 AM2021-03-18T09:07:19+5:302021-03-18T09:07:57+5:30
आशिष शेलार यांनी दाखल केलेली याचिका दाखल करून घेण्याजोगी नाही. कारण त्यांनी एका औषधे पुरवण्यासाठी निविदा भरलेल्या कंपनीच्यावतीने ही याचिका दाखल केली आहे.
मुंबई : कोरोनाच्या काळात औषधे खरेदी करण्याच्या प्रचलित निकषांशी तडजोड करण्यात येत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र, या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी आधी न्यायालयात पाच लाख रुपये जमा करा, असे निदेश शेलार यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आशिष शेलार यांनी दाखल केलेली याचिका दाखल करून घेण्याजोगी नाही. कारण त्यांनी एका औषधे पुरवण्यासाठी निविदा भरलेल्या कंपनीच्यावतीने ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ही जनहित याचिका होऊ शकत नाही, असा आक्षेप मुंबई महापालिकेतर्फे घेण्यात आला. त्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने गुणवत्तेच्या आधारावर या याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी याचिकाकर्त्यांनी आधी पाच लाख रुपये न्यायालयात जमा करावे, असे आदेश दिले.
अटींमध्ये बदल केल्याचा याचिकेद्वारे आरोप
विशिष्ट उत्पादकांच्या फायद्यासाठी औषधे आणि जंतुनाशक औषधांच्या पुरवठ्याच्या निवेदेतील अटी बदलल्या गेल्या, असा आरोप शेलार यांनी याचिकेद्वारे केला आहे.