आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:00 AM2024-02-12T10:00:28+5:302024-02-12T10:00:48+5:30
काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत या राज्य सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. टिळक भवन येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची रविवारी बैठक झाली. या बैठकीला चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राज्यातील सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
‘मविआत मतभेद नाहीत’
काँग्रेसने राज्यात विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा पूर्ण केला आहे. १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे शिबिर होत असून त्यात निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होईल. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या शिबिराचे ऑनलाइन उद्घाटन करतील. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. दिल्लीत एक व मुंबईत दोन बैठका झाल्या आहेत. लवकरच अंतिम निर्णय होईल, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.