मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:47 PM2023-11-02T16:47:39+5:302023-11-02T16:47:56+5:30
वकील गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आंदोलक हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई – मराठा आरक्षणासाठी राज्यात काही भागात हिंसक आंदोलन झाले. बीडमध्ये आमदारांची घरे, कार्यालये जाळण्यात आली. मुंबईत मंत्र्यांची गाडी फोडण्यात आली. मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असा ठराव समंत केला. त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे.
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले असून या याचिकेवर ८ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आंदोलक हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. त्यात काही भागात हिंसक वळण लागले आहे. त्याविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
मराठा समाज आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यातील वाद नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त विधाने केली होती. त्यात नुकतेच काही मराठा आंदोलकांनी सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे हा मुद्दा आणखी पेटला. गुणरत्न सदावर्ते मराठा समाजातील युवकांची माथी भडकवणारी विधाने करतात असा आरोप केला जातो.
मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणीही सदावर्ते यांनी केली होती. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते आणि मराठा समाजातील युवक हा वाद चिघखळा होता. त्यावर, प्रतिक्रिया देताना सदावर्तेंनी आमच्यात कुठलाच वाद नसल्याचे स्पष्ट केले. हे राजकीय डावपेच आहेत, जे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून होत आहेत, असेही सदावर्तेंनी म्हटलं होते. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनीच हा वाद सुरू केला आहे. काँग्रेसवाले सत्तेत नसल्यावर असं काहीतरी करत राहतात. आमच्यात हा कुठलाही वाद नसून आरक्षणाचा हा राजकीय डाव होता, हे पुढील काळात मराठा बांधव समजून घेतली, आमच्यात कुठलाही वाद नाही असं म्हटलं होते.