पोलिस म्हणतात, अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा शोधू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 06:13 AM2024-09-28T06:13:36+5:302024-09-28T06:13:43+5:30
मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी अक्षयच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती.
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा शोधू, अशी माहिती पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली. मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी, यासाठी अक्षयच्या वडिलांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे, न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे पोलिसांनी ही माहिती दिली.
कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी अक्षयच्या घराबाहेर पोलिस पहारा देत आहेत. काही वकिलांनी समाजमाध्यमांवर काही पोस्ट केल्याने दफनासाठी जागा मिळत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने यावर टीका करताना विचारले की, वकील का भाषणे देत आहेत? तुम्हाला बाहेर जाऊन भाषणे का द्यायची आहेत? सत्य बाहेर आणणे हे आपले काम आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळावा : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने हाताळावा, असे न्यायालयाने म्हटले. अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला केवळ जवळच्या नातेवाइकांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे, अशी विनंती वेणेगावकर यांनी केली. वडिलांच्या वकिलांना कोर्टाने तसे निर्देश दिले.