काँग्रेस पदाधिकाऱ्यांची वंचित आघाडीला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:34 AM2019-06-08T03:34:37+5:302019-06-08T03:34:50+5:30
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीबाबत साशंकता : लोकसभा निवडणुकीत दुरावलेला मुस्लीम, दलित मतदार पुन्हा जोडण्यासाठी प्रयत्न
मुंबई : लोकसभा निवडणुकीत दुरावलेला मुस्लीम आणि दलित मतदार पुन्हा एकदा जोडण्यासाठी काँग्रेसने विशेष प्रयत्न चालविले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संवाद वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता शुक्रवारी काँग्रेसच्या जिल्हावार बैठकीत व्यक्त करण्यात आली. तर, आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक मतदारसंघात काम करीत नाहीत, वंचित बहुजन आघाडी सोबत घ्या, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशातील नेत्यांकडे केली.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शुक्रवारी पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात जिल्हावार आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाºयांसोबत चर्चा झाली. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत आदी नेते उपस्थित होते. तर, विविध जिल्ह्यांतील शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, लोकसभेचे उमेदवार, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी पदाधिकारी होते.
जिल्ह्यातील राजकीय स्थितीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. विविध विषयांवर स्थानिक पदाधिकाºयांचे म्हणणे प्रदेश नेत्यांनी ऐकून घेतले. त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वंचित बहुजनला काँग्रेस आघाडीत सहभागी करून घेण्याची आग्रही मागणी काही पदाधिकाºयांनी केली. तर, राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तरी स्थानिक पातळीवर त्यांचे कार्यकर्ते काम करीत नाहीत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात, अशी तक्रार काहींनी केली. तर, राष्ट्रवादीपेक्षा वंचितला प्राधान्य देण्याची भूमिका काहींनी मांडली. याशिवाय काहींनी राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला आताच नक्की करावा. त्या फॉर्म्युल्यानुसार आताच संभाव्य उमेदवारांना काम सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, ऐनवेळी उमेदवारांची घोषणा आणि त्यानंतरचा गदारोळ या विधानसभा निवडणुकीत तरी टाळावा, अशी अपेक्षा काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली.
पक्षापासून दुरावलेला परंपरागत मतदार परत पक्षाकडे येईल, यासाठी तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषत: मुस्लीम आणि दलित समाजातील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, त्यांच्यासोबतचा संवाद कायम राहील याची काळजी घ्यावी आदी सूचना प्रदेश नेत्यांकडून करण्यात आल्या.
नांदेडच्या पदाधिकाºयांचे राजीनामे
राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. आता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षासह सर्व पदाधिकाºयांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. नांदेडमधील अशोक चव्हाणांचा पराभव स्थानिक पदाधिकाºयांच्या जिव्हारी लागला आहे. राजीनामे स्वीकारून नव्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी राजीनामे दिलेल्या पदाधिकाºयांनी केली आहे.