अपात्रता तरतुदींचे पालन करूनच कारवाई : राहुल नार्वेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:13 AM2023-10-02T08:13:31+5:302023-10-02T08:13:51+5:30
विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
मुंबई : संविधानातील तरतुदींचे पालन करूनच अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र अपात्रता अधिनियम १९८६ च्या नियमांचे तंतोतंत पालन करूनच आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
ॲड. नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ज्या लोकांना नियम समजत नाहीत, ज्यांना संविधानातील तरतुदींची माहिती नाही, त्यांनी केलेल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही आणि पडणारही नाही.
योग्य निर्णय घ्या, अन्यथा दूरगामी परिणाम : चव्हाण
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन हे कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नसून, त्याचे आगामी काळात दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचा विचार करून उचित निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन निर्णय व्हायला पाहिजे. बहुतांश आमदार पक्षांतर बंदी कायद्याची पर्वा करीत नसल्याचे दिसून येत आहे.