Maharashtra Election 2019: पावसाच्या संगतीने प्रचाराची सांगता; आता सुरू धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 04:37 AM2019-10-20T04:37:37+5:302019-10-20T06:33:48+5:30
जाहीर सभा, रोड शो अणि पदयात्रांवर भर; राज्यात उद्या मतदान
मुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीचा शिगेला पोहोचलेला प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. आता २१ आॅक्टोबरच्या मतदानाची व २४ तारखेच्या निकालाची उत्सुकता आहे. अनेक ठिकाणी आज पावसाने प्रचारात व्यत्यय आणला, पण उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
विदर्भाचा काही भाग वगळता राज्यभर पाऊस होता. त्या पावसातच नेते व उमेदवारांच्या सभा रोड शो व पदयात्राही सुरू होत्या. उघड प्रचार संपला आहे, तरी उमेदवार रविवारी मतदारांच्या भेटीगाठी घेतील आणि कार्यकर्तेही सोमवारी मतदान अधिकाधिक व्हावे, यासाठी प्रयत्न करतील. रविवार व सोमवारीही पावसाची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी नेत्यांनी शनिवारी सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही प्रचारात उतरले.
सोनिया गांधी यांच्या सभा रद्द झाल्याने काँग्रेसतर्फे राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिद्धरामय्या, ज्योतिरादित्य सिंदिया आदींनी सभा आणि पत्रकार परिषदा घेतल्या.
पंकजा मुंडेंना आली भोवळ ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना बीडमध्ये भाषण आटोपताच भोवळ आली. जागरण व प्रचाराची दगदग यामुळे हे घडले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले.
साकोलीत हाणामारी
भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत भाजपचे उमेदवार परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी रात्री हाणामारी झाली. एकमेकांविरुद्ध तक्रारींवरून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फुके यांचे बंधू नितीन फुके यांचे अपहरण पटोलेंच्या समर्थकांनी करून त्यांना मारहाण केल्याची तक्रारही आहे.
शहांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. शहा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सभेसाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. मात्र, पावसाळी वातावरणामुळे वैमानिक व सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्याने तत्काळ हेलिकॉप्टर ओझर विमानतळावर उतरविले.