भाजपा-शिवसेनेविरोधात महाआघाडी करण्याच्या हालचाली; काँग्रेसचा राहुल गांधींकडे प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 06:13 PM2018-06-09T18:13:16+5:302018-06-09T18:13:35+5:30
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी पडेलेल्या मते आणि कर्नाटकचे समीकरणं याचा विचार करत काँग्रेसने पहिलं पाऊल टाकलं आहे.
मुंबई : आगामी निवडणूकीमध्ये भाजपा सरकार विरोधात महाराष्ट्र काँग्रेसने तयारी सुरु केली असून यासाठी आज बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय महाआघाडी करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून तसा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीकडे पाठण्यात आला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधी पडेलेल्या मते आणि कर्नाटकचे समीकरणं याचा विचार करता महाराष्ट्रात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करण्यासाठी काँग्रेसने पहिलं पाऊल टाकलं आहे.
आज गांधीभवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, विजय वडेट्टीवार, खा. हुसेन दलवाई, माजी आ. माणिकराव जगताप, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील उपस्थित होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, बहुजन विकास आघाडी, सीपीएम, रिपाई (प्रकाश आंबेडकर) या समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितलं.