Video:...तर अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्या; संतप्त अजितदादांची विधानसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 03:22 PM2019-06-20T15:22:41+5:302019-06-20T15:23:08+5:30
कालच एक लक्षवेधी झाली त्यामध्ये रसवंतीगृहात ८० टक्के बर्फ हा दुषित पाण्यापासून तयार केला जात आहे ही गंभीर बाब आहे. बेजबाबदारपणा आहे
मुंबई - शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार नेहमीच आग्रही असताना पाहायला मिळतात. त्यामुळे या गोष्टींशी ते कधीच तडजोड करत नाहीत. विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा आज अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित करत आपला संतापही व्यक्त केला.
विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याचा मुद्दा अजित पवार म्हणाले की, १२ - १२ तास अधिकारी, कर्मचारी काम करत असतात त्यांच्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे सापडत असतील तर हा त्यांच्या भावनेचा, श्रध्देचा अपमान आहे. महाबळेश्वर, लोणावळा याठिकाणी संबंधित खात्याने धाडी टाकल्या आहेत. कालच एक लक्षवेधी झाली त्यामध्ये रसवंतीगृहात ८० टक्के बर्फ हा दुषित पाण्यापासून तयार केला जात आहे ही गंभीर बाब आहे. बेजबाबदारपणा आहे असं त्यांनी सांगितले.
विधानभवनाच्या उपाहारगृहात मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळणं गंभीर आहे.याआधी धाडीत महाबळेश्वर,लोणावळा,रसवंतीगृहात निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त केले.CM @Dev_Fadnavis जी दोषींवर कडक कारवाई करा.अशा गैरकारभारावर चाप बसवण्यासाठी संबंधित खात्यांत पुरेसे मनुष्यबळ हवंय.#MonsoonSessionpic.twitter.com/kRk2INZe0D
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 20, 2019
तसेच आज लोकांना कळेना कुठल्या हॉटेलमध्ये जावून खावे, खावे तर काय खावे. आरोग्याला आज धोका निर्माण झाला आहे. कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. त्याशिवाय हे शहाणे सरळ होणार नाही त्यामुळे सरकार यावर काय करणार असा सवालही संतप्त झालेल्या अजितदादांनी उपस्थित केला
सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी शाकाहारी थाळी मागवली होती. या थाळीत मटकीची उसळ होती. जेवताना मटकीच्या उसळीत चिकनच्या हाडांचे तुकडे सापडल्याने मनोज लाखे अस्वस्थ झाले. या प्रकाराची त्यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली आहे. कँटीनच्या कंत्राटदारवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. पण कँटीन प्रशासनाकडून या प्रकाराबाबत मनोज लाखे यांची माफी मागितली.