Vidhanparishad: रात की बात... सात काँग्रेस आमदारांनी ऐनवेळी वाढवलं होतं भाईंचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:30 AM2022-06-20T09:30:31+5:302022-06-20T09:31:57+5:30
विधानपरषिदेच्या मतदानाला सुरुवात झाली असून हरिभाऊ बागडे यांनी मतदानाचा पहिला हक्क बजावला आहे
मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने लक्षवेधी विजय मिळवल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढली आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणार आहेत. आपल्या आमदारांची सोय म्हणून आणि ऐनवेळी कुठलीही रिस्क नको म्हणून सर्वच पक्षाच्या आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. काँग्रेसचे आमदारही फोर सिझन हॉटेलमध्ये होते. मात्र, मध्यरात्री अचानक 7 ते 8 आमदार गायब झाल्याने काँग्रेस नेत्यांची धाकधूक वाढली होती. त्यातच, काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप चांगलेच काळजीत पडले होते.
विधानपरषिदेच्या मतदानाला सुरुवात झाली असून हरिभाऊ बागडे यांनी मतदानाचा पहिला हक्क बजावला आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना सर्वच नेते विजय आमचाच, गुलाल आम्हीच उधळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप हेही विधानभवनात पोहोचले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नव्हती, राजकीय परंपरेचा इतिहास आपण पाहिल्यास या निवडणुकींसाठी मतदान झालं नाही. मात्र, भाजपने राजकीय संस्कृती खंडीत केल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं. तसेच, आमचा विजय नक्की आहे, महाविकास आघाडीचे सर्वच आमदार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हॉटेल फोन सिझन येथे मुक्कामास असलेल्या काँग्रेस आमदारांपैकी 7 आमदार मध्यरात्री अचानक हॉटेलमधून गायब झाले होते. यासंदर्भात हॉटेलमध्ये चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेनंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि उमेदवार असलेल्या भाई जगताप यांनी फोनाफोनी करुन माहिती घेतली. त्यावेळी, आमदारांशी संवाद झाल्यानंतर त्यांची धाकधूक कमी झाली. ते सातही आमदार पहाटेच्या सुमारास हॉटेलवर परतल्यानंतर भाई जगताप यांचा जीव भांड्यात पडला.
नेत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबतं
रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या आघाडीच्या नेत्यांनी फोनवरून चर्चा केली. दरम्यान, फोर सीझन हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रात्री उशिरा काँग्रेसचे नेते व आमदारांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेलात जाऊन मार्गदर्शन केले. ‘चिंता करू नका, आपल्याला विजय सोपा नसला तरी अशक्यप्राय काहीही नाही’ या शब्दांत विश्वास व्यक्त केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काळजीपूर्वक मतदान करण्याचा सल्ला दिला.