खटला रद्द करण्यासाठी राहुल गांधी हायकोर्टात; ५ डिसेंबरला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:19 AM2023-10-18T09:19:47+5:302023-10-18T09:20:03+5:30
राहुल यांनी तक्रार रद्द करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज फेटाळल्यानंतर या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी आरएसएस संघटनेचा संबंध असल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात २०१७ साली फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने ५ डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
बंगळुरूतील पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर जो कोणी भाजप-आरएसएस विचारसरणीच्या विरोधात बोलतो त्याच्यावर दबाव आणला जातो, त्याला मारहाण होते किंवा ठार मारले जाते, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केले होते. दुसरीकडे, पत्रकारांच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचे वक्तव्य सीपीआय(एम) सचिव सीताराम येचुरी यांनी केले होते.
त्यानंतर, वकील धृतीमान जोशी यांनी भादंविचे कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत राहुल आणि सोनिया गांधी तसेच येचुरी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार नोंदविली. त्याची दखल घेऊन दंडाधिकारी न्यायालयाने गांधी आणि येचुरी यांना समन्स बजावले.
राहुल यांनी तक्रार रद्द करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज फेटाळल्यानंतर या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली व त्यानुसार पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
याचिकेत काय म्हटले आहे ?
दोन्ही विधाने वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्ररीत्या करण्यात आली आहेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावर एकत्रितरीत्या तक्रार करता येणार नाही, याबाबतची तक्रार आणि दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आदेश रद्दबातल करण्यात यावेत.