राहुल गांधींनीच राजीनामा मागे घ्यावा; मागणीसाठी सुशीलकुमारांचीच आघाडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:53 AM2019-07-02T05:53:24+5:302019-07-02T05:53:54+5:30
राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आघाडी उभारली असून त्या आघाडीचे नेतृत्वच शिंदे करत असल्याचे समजते.
- राजा माने
मुंबई : अ भा. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा असतानाच खुद्द राहुल गांधी यांनीच आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते कामाला लागले असून त्यामध्ये सुशीलकुमारही आघाडीवर आहेत.
लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु काँग्रेस वर्कींग कमिटीने राहुल यांचा राजीनामा नाकारला. मात्र, राहुल आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला.
राहुल आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे समोर आली. त्यात सर्वप्रथम राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव समोर आले होते. परंतु गेहलोत यांचे
नाव मागे पडले असून आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.
प्रसार माध्यमांवर शिंदे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, अध्यक्षपदाविषयी आपले पक्षश्रेष्ठींशी काहीही बोलणे झाले नाही. वास्तविक पाहता राहुल यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी भावना आपली आणि पक्षातील नेत्यांची असल्याचे ते म्हणाले.
राहुल यांनीच अध्यक्षपदी राहावे यासाठी वरिष्ठ नेत्यांनी आघाडी उभारली असून त्या आघाडीचे नेतृत्वच शिंदे करत असल्याचे समजते. राहुल गांधीच काँग्रेसला नवसंजीवनी देण्यास समर्थ आहेत, अशी भावना काँग्रेस नेत्यांची असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर शिक्कमोर्तब होणार असून त्यानंतरच काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी की सुशीलकुमार शिंदे हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव नक्की झाल्याच्या बातमीत तथ्य नाही, मला त्याबाबत कसलीच माहिती नाही, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.