राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात? मतदारसंघ ठरला अन् प्रचारालाही सुरुवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 01:30 PM2024-02-24T13:30:00+5:302024-02-24T13:32:29+5:30
राहुल नार्वेकर यांना पक्षाने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे समजते.
Rahul Narvkear ( Marathi News ) : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना ज्या नेत्यांची सर्वाधिक चर्चा झाली त्यामध्ये भाजप नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव अग्रेसर होतं. केंद्रीय निवडणूक आयोगानंतर राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा मूळ पक्ष एकनाथ शिंदे यांचा आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांचा असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. नार्वेकर यांच्या या निर्णयांच्या बाजूने आणि विरोधातही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. हेच राहुल नार्वेकर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. नार्वेकर यांना पक्षाने दक्षिण मुंबईलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचे समजते.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत कोणाला मिळणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती आहे. तसंच भाजपकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं बोललं आहे. त्यादृष्टीने नार्वेकर यांनी तयारी सुरू केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात?
राहुल नार्वेकर हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून करणार आहेत. आज आणि उद्या नार्वेकर यांच्या उपस्थितीत वरळीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीत बड्या चेहऱ्यांना उतरवण्याची भाजपची रणनीती आहे. देशभरातील अनेक ठिकाणी भाजपकडून असा प्रयोग केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्ष असणाऱ्या राहुल नार्वेकरांना मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आग्रह केल्याची माहिती आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर खरंच या मतदारसंघातून निवडणूक लढवतात का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.