एसटी कर्मचाऱ्यांना 20 लाखांपर्यंतची रक्कम वाढवून द्या - भाई जगताप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 03:26 PM2019-02-22T15:26:28+5:302019-02-22T15:39:54+5:30
एसटी कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर विविध भत्ते व उपदान अधिनियम १९७२ मधील तरतुदी नुसार २० लाख रुपयांपर्यंतची उपदान रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून द्यावी अशी आग्रही मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर विविध भत्ते व उपदान अधिनियम १९७२ मधील तरतुदी नुसार २० लाख रुपयांपर्यंतची उपदान रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने वाढवून द्यावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रसचे अध्यक्ष, कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी केली आहे. जगताप यांनी परिवहन मंत्री व एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे ही मागणी केली आहे. शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही महिती दिली.
घरभाडे भत्ता वाढवून द्या
जून २०१८ मध्ये एस.टी. महामंडळाने जाहीर केलेल्या वेतनवाढीमध्ये घरभाडे भत्त्याचा दर एक्स शहर २१%, वाय शहर १४% व झेड शहर ७% इतका असुन सातव्या वेतन आयोगानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा घरभाडे भत्यामध्ये वाढ करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुक्रमे एक्स शहर २४% ,वाय शहर १६% व झेड शहर ८% इतका करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वार्षिक वेतन वाढीचा दर ३% करावा
सन २०१६-२० च्या वेतनवाढीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढीचा दर दोन टक्के केला आहे. तो सुधारून सातव्या वेतन आयोगानुसार तीन टक्के इतका करावा अशी महत्त्वाची मागणी जगताप यांनी केली आहे.
तसेच राज्य परिवहन महामंडळातीळ कर्मचाऱ्यांना उपदान अधिनियम १९७२ मधील तरतुदीनुसार, उपदानाची रक्कम अदा केली जाते. केंद्र शासनाचे राजपत्र २९ मार्च २०१८नुसार पुर्वलक्षी प्रभावाने रुपये २० लाख इतकी रक्कम उपदान म्हणुन लागू करावी अशी आग्रही मागणी जगताप यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.
या बैठकीला सरचिटणीस श्रीरंग बरगे, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत काकडे, शेखर कोठावळे, डी.ए.लीपणे पाटील, विजय बोरगमवार, संजीव चिकुर्डेकर,राजेश सोलापण, गणेशशिंग बैस, संतोष गायकवाड, श्रीकांत आढाव, कादंबरी चव्हाण, अनिता पाटील, मनीषा कालेश्वर, धनंजय पाटील, अंसार शेख, मधुकर तांबे, प्रकाश कदम, फय्याज पठाण, संदेश खेडेकर, हनुमंत वरवटे, आनंद तिगोटे, संतोष जाधव, आर. पी.सय्यद, मुकेश भालेराव, दीपक जगदाळे, विजय खेडकर, सुनील फल्ले, दीपक पवार, जोतिबा दराडे आणि नांदेडचे नगरसेवक महेंद्र पिंगळे आदी पदाधिकारी हजर होते.