वाद सैन्य भरतीचा होता, पण चतुराईने शिवसेनेकडे वळवला; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 02:20 PM2022-06-22T14:20:38+5:302022-06-22T14:35:16+5:30
महाराष्ट्राच्या राजकारण शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे मोठा भूकंप झाला आहे
मुंबई - केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर करताच देशभरातून या योजनेला मोठा विरोध होऊ लागला. या योजनेविरुद्ध तरणाई रस्त्यावर उतरली. बिहार आणि युपीमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या, त्यानंतर देशभरातून या योजनेविरुद्ध तरुणाई आंदोलन करत होती. त्यातच, गृहमंत्री अमित शहा यांनी योजनेत काही बदल केल्याची जाहीर केले. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. या घटनेचा संबंध ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार राज बब्बर यांनी थेट महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी जोडला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारण शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे मोठा भूकंप झाला आहे. शिंदे हे शिवसेनेपासून फारकत घेत सध्या 40 आमदारांसह आसाममध्ये आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकार अस्थीर झालं असून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या ट्विटमुळे विधानसभा भरखास्त होण्याची, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील या राजकीय घडामोडीसंदर्भात अनेकजण तर्क-वितर्क, अंदाज आणि राजकीय मत व्यक्त करत आहेत.
बहस तो सेना में भर्ती को लेकर थी। शिव सेना की तरफ़ कितनी सफ़ाई से मोड़ दी गयी। और कश्मीर में पंडितों की सुरक्षा के मसले की तो अब चर्चा भी नहीं हो रही। #MaharashtraPoliticalTurmoil
— Raj Babbar (@RajBabbar23) June 22, 2022
काँग्रेस नेते राज बब्बर यांनीही यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. बब्बर यांच्या ट्विटवरुन त्यांनी थेट केंद्रातील भाजप सरकारलाच याबाबत जबाबदार धरल्याचं दिसून येत आहे. कारण, देशभरात सैन्य दलाच्या भरतीचा वाद सुरू होता. मात्र, किती चतुराईने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात आला. तर, कश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा मुद्दा तर आता उरलाच नाही, असे ट्विट राज बब्बर यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटचा रोख पूर्णपणे भाजप सरकारवर असल्याचे दिसून येते.
आमच्यासोबत ४६ आमदार
"आम्ही बंडखोर नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि राहणार. हिंदुत्वाच्या मार्गावर आम्ही चालत आहोत आणि आतापर्यंत ४६ आमदार आमच्यासोबत आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच गटनेतेपदी अजय चौधरी यांची केलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यात नवा पेच निर्माण झाला आहे.