महाआघाडीत राज ठाकरेंना स्थान नाही! अशोक चव्हाणांची लोकमतशी 'मनसे' बात
By राजा माने | Published: February 4, 2019 08:08 PM2019-02-04T20:08:08+5:302019-02-04T20:16:26+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुका आणि राजकीय परिस्थिती यावर त्यांनी आपली रोखठोक मते मांडली.
राजा माने
मुंबई - महाआघाडी ही मूलभूत विचारसरणीच्या आधारावरच उभी राहिली आहे. महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे काय, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट विरोध केला आहे. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत तसेच आगामी लोकसभा निवडणुका आणि राजकीय परिस्थिती यावर त्यांनी आपली रोखठोक मते मांडली. देशातील राजकारण, मोदी सरकार, अर्थसंकल्प, आण्णा हजारेंच उपोषण, ठाकरे सिनेमा, आघाडी, आघाडीत मनसेला स्थान यांसह विविध विषयांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच आठवडाभरात आघाडीचा अंतिम निर्णय घेऊ, हेही स्पष्ट केले.
माझी अजित पवारांसोबत चर्चा झाली, त्यानुसार जी जागा त्यांना सोयीचं वाटते ती त्यांनी घेतली पाहिजे, जी आम्हाला सोयीची आहे ती आम्ही घेतली पाहिजे. याबाबत अंतिम चर्चा बाकी असून मी ठेवलेला प्रस्ताव त्यांनाही मान्य आहे. लवकरच निवडणुका जाहीर होतील, त्यामुळे या आठवड्यात जागावाटपाची चर्चा संपवून टाकली पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, स्वागतचं.
मी भुजबळ आणि राष्ट्रवादीची इतर मंडळी एकत्र येऊन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही भेटलो. त्यांना 12 जागा देणं शक्य नाही, पण आम्ही त्यांना योग्य जागा वाटप करू, असे मी प्रकाश आंबेडकरांशी बोललो, तसेच सीपीआय, सीपीएम, राजू शेट्टी, कवाडे यांची आरपीआय यांसारख्या 7-8 पक्षांशी आमची बोलणी झालेली आहे. त्यानुसार या आठवडाभरात अंतिम स्वरुप देण्याचा माझा प्रयत्न राहिल. संभाजी ब्रिगेडची काँग्रेसला पाठिंबा देण्याची मनापासून इच्छा आहे. आम्हीही त्यांना सोबत घेऊ, असे चव्हाण म्हणाले. जागावाटप करताना समजा 8 जागा आम्ही इतर पक्षांना दिल्या, तर त्यापैकी 4 जागा राष्ट्रवादी देईल, 4 जागा आम्ही देऊ. त्यामुळे जागावाटपात घटक पक्षांना दोन्ही पक्षांकडून समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीत-बिघाडी अजिबात नाही
"आघाडीत बिघाडी" बाबतच्या चर्चेबद्दल बोलताना, सत्ताधारी पक्षाकडून अशा वावड्या उठवल्या जात आहेत. आघाडी होऊ नये अशी सत्ताधारी पक्षांची इच्छा असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितल. मतांच विभाजन टाळल गेल पाहिजे ही आमची भूमिका आहे. गेल्या निवडणुकीत ७०टक्के मते भाजप-सेनेच्या विरोधात राहिली आहेत. केवळ, ३० टक्के मतांवर भाजपा-सेनेचं सरकार उभारलंय. त्यामुळे सर्वच समविचारी पक्षांना आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरील घोषणापत्र
अर्थसंकल्पबाबात विचारले असता, गेल्या पाच वर्षात काहीही न केल्यामुळे हे झाकण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. हे जे बोलतील ते करतीलच का हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच, रोजगाराचा विषयही तसाच आहे. जीएसटी लागू केला, त्यातही बदल करण्याचे सुचवलं आहे. जीएसटीमुळे व्यापारी अडचणीत आला आहे. पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलंय. मात्र, या सगळ्या घोषणा निवडणुकांच्या तोंडावर केल्या जात आहेत, हा खरा मुद्दा आहे. तर, आरएसएसची विचारसरणी असलेल्या सरकारला पुन्हा संधी द्यायची का हा खरा प्रश्न आहे. महात्मा गांधीजीच्या जयंतीदिनी त्यांच्याच फोटोवर गोळीबार करणारी ही मंडळी आहे, असेही चव्हाण यांनी म्हटलंय.
ही तर शेतकऱ्यांची थट्टाच..
सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला देणं म्हणजे १७ रुपये दररोज. दिवसाला १७ रुपये देणे ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे. तुम्ही सांगितल की किमान आधारभूत किंमतीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचा माल कुठेच खरेदी केला जात नाही. कर्जमाफीचेही पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. दिवसाला १७ रुपये म्हणजे किमान वेतनापेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्याला देण्यात आली आहे.
आण्णांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता
आण्णा हजारेंच उपोषण आणि सरकारची भूमिका याबाबत प्रश्न विचारला असता, सरकारचं धोरण फक्त घोषणा करायच्या अन काम काहीच नाही असं आहे. कारण, आमचं सरकार असतानाही आण्णांनी उपोषण केलं होतं. त्यावेळी, मी, विलासराव आणि आमच्या नेत्यांनी वारंवार आण्णांशी चर्चा केली. त्यांना बैठकीलाही बोलावलं. आण्णा हट्टी स्वभावाचे आहेत, पण त्यांचे म्हणणे बरोबर आहे. मात्र, सरकार आजही आण्णांच्या मागण्या पूर्ण करु शकलं नाही. लोकपालचा केंद्रात कायदा झाला, मग अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला. आम्ही सातत्याने आण्णांच्या संपर्कात असून आण्णांनी उपोषण सोडावं अशी आमची भूमिका आहे. आण्णांच वय आणि प्रकृती लक्षात घेता, आण्णांची आम्हाला काळजी वाटते, असेही चव्हाण यांनी म्हटले.
जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही
बाळासाहेबांची शैली वेगळी होती, त्यां नुकताच त्यांच्यावरील सिनेमा आला. पण, बाळासाहेबांना जे जमलं ते उद्धवना जमेल असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब हे बाळासाहेब होते. तर, अॅक्सिटेंडल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात सर्व फॅक्ट चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला निगेटीव्ह पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमांकडे केवळ करमणुकीचे माध्यम म्हणून पाहाता येईल. याचे अनुकरण होऊ शकत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार वाद
सीबीआयचा गैरवापर केला जातोय. ममता बॅनर्जी असो किंवा चंद्राबाबू नायडू असो यांचा निर्णय चुकीचा नाही. राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशी परिस्थिती या सरकारने निर्माण केलीय. कायद्याच्या अडचणीत आणून राज्य सरकारला काम करु द्यायच नाही, असा डाव आहे. राज्य सरकार अस्थिर करण्याचा डाव आहे. चंद्राबाबू नायडूंनी सीबीआयला राज्याच्या अधिकारातही येऊ दिल नाही. केंद्र सरकारकडून पॉलिटीकल ब्लॅकमेलिंग सुरू आहे. कर्नाटक, मणिपूरमध्येही तेच सुरूय.
आम्ही प्रसिद्धी करत नाहीत, काँग्रेसचही बुथ मॅनेजमेंट उत्तम
भाजपच बुथ मॅनेजमेट उत्तम असून 10 कोटी जनेतपर्यंत पोहोचण्याचा प्रस्ताव भाजपाचा सुरु आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, काँग्रेस काम करतं, पण आम्ही प्रसिद्धीच्या भानगडीत पडत नाही. आमच्या प्रत्येक जिल्ह्यात बुथ कमिट्या आहेत, त्याचे मेळावे आणि बैठका नेहमी होतात. राज्यभर ट्रेनिंग कॅम्प सुरू आहेत. राज्यातून पोलिंगसाठी काँग्रेसची पूर्ण यंत्रणा कामाला लागली असल्याचंही चव्हाण यांनी सांगितले.
महाआघाडीत मनसेला स्थान नाही-
महाआघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला घ्याल का, या प्रश्नावर चव्हाण यांना प्रश्न विचारला. त्यावर, बोलताना मनेसला महाआघाडीत स्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मनसेला राष्ट्रवादीच्या की काँग्रेसच्या कोट्यातून जागा मिळतील, हा विषय नाही. एकंदरीत राज ठाकरेंची जी विचारसरणी आहे, त्यांचा मुंबईतील उत्तर भारतीयांना असलेला विरोध. हिंसाचाराला असलेला पाठिंबा. त्यामुळे राज यांच्याबद्दल त्यांच्या आयडियालॉजीचा खरा विषय असल्याच चव्हाण यांनी म्हटलं. उद्या तुम्ही म्हणाल आरएससशी आघाडी कराल का ? तर ते शक्य नाही. त्यामुळे महाआघाडीत मनसेला स्थान नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय*
भावी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्ष घेईल.
नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालय. राज्यात कांग्रेसचा पराभव झाला तेंव्हा नांदेडमध्ये आपल्या नेतृत्वात काँग्रेसने गड राखलाय. मग, भावी मुख्यमंत्री म्हणून जिल्हा तुमच्याकडं पाहतोय, तुमची काय इच्छाय, असे विचारले असता पक्ष जे सांगेल तीच माझी इच्छा, असल्याच चव्हाण यांनी सांगितले. मला केंद्रात काम करायला सांगितल तर मी केंद्रात करेल, मला राज्यात काम करायला सांगितलं तर मी राज्यात करेल. त्यामुळे माझ्याबाबतचा निर्णय मी पक्षाध्यक्षांकडे सोपवला आहे. पण, जिल्ह्यातील लोकांनी व्यक्त केलेल्या भावना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाकडे पाठविल्या आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
मलाही वजन घटावयची इच्छा
मला दगदग खूप आहे,मला प्रवास खूप आहे, जबाबदारी जास्त आहे. भेटणाऱ्यां लोकांची संख्या जास्त आहे, ताण प्रचंड आहे. या सर्व बाबींचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होते. त्यामुळे मलाही आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. मलाही पवारसाहेबांप्रमाणे वजन घटवायची इच्छा आहे. आयपीएल मॅचप्रमाणे कमी वेळेत जास्त धावा काढायच्या, तसंच माझं काम आहे. वेळ कमी असून कामाचा व्याप जास्त आहे. तरीही, प्रकृतीची काळजी घ्यावीच लागणार आहे.
राज्यात काँग्रेसला पोषक वातावरण
राज्यात काँग्रेस आणि आघाडीला पोषक वातावरण आहे. मी गेल्या सहा महिन्यांमध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात फिरलोय, जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून मी कोकणातही फिरलोय. त्यामध्ये काँग्रेसला लोकांचा पाठींबा मिळत असल्याचं चित्र आहे. तसेच राज्यात आघाडी व्हावी, अशीही लोकांची इच्छा आहे.