"राम एकवचनी होते, देवाभाऊंना विसर पडला अन् 'पहाटं-दुपारी' लव्ह मॅरेज केलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 02:03 PM2024-01-23T14:03:52+5:302024-01-23T14:06:08+5:30
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेनं आगामी निवडणुकांचं रणशिंगच फुंकलं आहे.
मुंबई - नाशिक येथील शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याचं राजकारण आणि केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावरुन टीका केली. तर, राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तुलना रामायणातील वालीशी केली. उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीराम हे एकवचनी होते, तुम्ही वचनं मोडणारे आहात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला. तत्पूर्वी भाषण करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रभू श्रीरामांचा दाखला देत भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली.
शिवसेनाप्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून शिवसेनेनं आगामी निवडणुकांचं रणशिंगच फुंकलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आधिवेधनाला नाशिक शहरातील हॉटेल डेमोक्रॉसी येथे आज सुरुवात झाली. शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. तत्पूर्वी शिवसेना नेते संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.
सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीरामाचा दाखला देत, राम हे एकवचनी होते. पण, ह्यांचा नेता ७२ तासांच्या आता विसरुन जातो की, ७० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत सोबत घेतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदर्भ देत आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, ते आमचे देवाभाऊ इकडे एकवचनी म्हणतात, राष्ट्रवादीशी कधीही युती नाही असं म्हणतात, आणि पहाटं-दुपारी दोनदोनदा लव्ह मॅरेज करतात, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
भाजपामुक्त जय श्रीराम
आपला इतिहास आहे, जो महाराष्ट्रावर आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. मग तो अफझलखान असो किंवा औरंगजेब. प्रभू रामचंद्र ही कोणा एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. नाहीतर आम्हालाही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. जय श्रीराम ऐवजी भाजपमुक्त जय श्रीराम म्हणावे लागेल. राम की बात झाली, काम की बात करा, काँग्रेस सोडा, गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.