“लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा”: रमेश चेन्नीथला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 05:32 PM2024-07-12T17:32:02+5:302024-07-12T17:33:30+5:30
Congress Ramesh Chennithala News: राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकला तर पंतप्रधान मोदींचे सिंहासन डळमळीत होईल. नरेंद्र मोदींची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घसरली असून, राहुल गांधींना देशभरातून समर्थन मिळत आहे, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
Congress Ramesh Chennithala News:काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसची परंपरा घेऊन वाटचाल करा. निवडणुकीत युवक काँग्रेसवर मोठी जबाबदारी असते. घरोघरी जाऊन प्रचार करणे. मतदाराला मतदान केंद्रावर आणणे यासह पक्षाची सर्व कामे युवक काँग्रेसला करायची आहेत. विधानसभा निवडणुकीला ९० दिवस बाकी आहेत, या ९० दिवसात सरकार बदलण्यासाठी सर्व पातळीवर काम करण्याची गरज आहे. लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक टिळक भवनमध्ये संपन्न, यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहा विभागात बैठका घेऊन कार्यक्रमांची आखणी करा व प्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवा. विभाग, जिल्हा, ब्लॉक, पंचायत किंवा बुथ लेवलवर बैठका घ्या. जनता महाविकास आघाडीबरोबर आहे, महाराष्ट्रात परिवर्तन व्हावे अशी जनतेची भावना आहे परंतु संघर्ष केल्याशिवाय विजय मिळणे सोपे नाही, असे चेन्नीथला यांनी यावेळी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार
काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका होत होती परंतु लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे पण पुढील लढाई सोपी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे. महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा विजय मिळावा यासाठी काम करा. या तीन राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकला तर दिल्लीतील मोदींचे सिंहासन डळमळीत होईल, असे रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशभरातून दोन पदयात्रा काढल्या. त्याचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला. राहुल गांधी जनतेचे दुःख जाणून घेतात आणि जनतेचाही त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे. देशभरात नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटत चालली आहे, तर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत दररोज वाढ होत आहे. विधानसभा निवडणुकीत तरुणांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे ते रास्त आहे. ज्यांच्यामध्ये विजयी होण्याची क्षमता आहे त्याला उमेदवारी देण्याचा विचार पक्ष करेल. काँग्रेस पक्षात नवीन चेहऱ्यांना नेहमीच संधी दिली जाते, असे ते म्हणाले.