Rashmi Thackeray : रश्मी यांच्या अडचणी वाढणार?, किरीट सोमय्या हायकोर्टात याचिका दाखल करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 01:52 PM2022-05-04T13:52:52+5:302022-05-04T13:53:43+5:30
Rashmi Thackeray : मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणाऱ्या ९ एकर जमिनीवरील १९ बंगाल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेत मुंबई उच्च न्यायालयात सोमय्या याचिका दाखल करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणाऱ्या ९ एकर जमिनीवरील १९ बंगाल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी आता ते लवकरच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. आज अलिबाग येथे अॅड. किरण कोसमकर, अॅड. अंकित बंगेरा सह १२ वकिलांशी चर्चा केली असून पुढिल १० दिवसांत याचिकेचे काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, रश्मी ठाकरेंनी अन्वय नाईकांकडून कोर्लई येथे 9.5 एकर जमिन 19 बंगल्यांसह विकत घेतली. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीय या 5.42 कोटी किंमत असलेल्या 19 बंगल्यांसाठी 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2021 पर्यंत कर भरत होते आणि त्याआधी कर भरला होता. पण इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये हे बंगले दाखवले गेले नाही आणि आता ठाकरे म्हणत आहेत की, बंगले गायब झालेत. किरीट सोमय्यांनी आज अलिबाग येथे अॅड. अंकित बंगेरा याच्या निवासस्थानी दहा वकिलांसह याचिकेबाबत चर्चा केली. लवकरच रश्मी ठाकरे यांच्या १९ कथित बंगल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटलं. किरीट सोमय्या यांनी उचललेल्या या पावलामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.