१० वकिलांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमण्याची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:55 AM2022-02-17T10:55:33+5:302022-02-17T10:56:23+5:30
मुंबई उच्च न्यायालयात ९४ न्यायाधीशांची पदे आहेत. मात्र त्यातील ५९ न्यायाधीशांची पदेच भरण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १० ज्येष्ठ वकिलांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी नेमण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. त्यामध्ये किशोर संत, शर्मिला देशमुख, अरुण पेडणेकर, संदीप मारणे, गौरी गोडसे, राजेश पाटील आदींचा समावेश आहे.
त्याशिवाय वाल्मिकी मेनेझेस एसए, कमल खटा, अरिफ सालेह डॉक्टर (मुंबई), सोमशेखर सुंदरेसन या ज्येष्ठ वकिलांनाही मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमची बुधवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने मान्य केल्यानंतर या १० नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयात ९४ न्यायाधीशांची पदे आहेत. मात्र त्यातील ५९ न्यायाधीशांची पदेच भरण्यात आली आहेत. त्यामध्ये ५२ न्यायाधीशांची कायमस्वरुपी नियुक्ती असून ७ अतिरिक्त न्यायाधीश आहेत.