'माझ्यापेक्षा पत्नीचा पगार जास्त म्हणून लक्षात राहतो'; फडणवीसांनी उलगडलं घरचं 'बजेट'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 01:23 PM2020-03-05T13:23:25+5:302020-03-05T13:27:57+5:30
Devendra Fadnavis: अर्थसंकल्प एक अशी रचना आहे त्याची कार्यपद्धती समजली की तर केंद्राचा असो वा राज्याचा अर्थसंकल्पाचं विश्लेषण करु शकतो.
मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून उद्या अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. मात्र त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत सांगताना घरातल्या बजेटचं गणित उलगडलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्प एक अशी रचना आहे त्याची कार्यपद्धती समजली की तर केंद्राचा असो वा राज्याचा अर्थसंकल्पाचं विश्लेषण करु शकतो. आपल्या घरचं बजेट तयार करतो, माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला जास्त पगार मिळतो म्हणून मला पत्नीचा पगार अधिक लक्षात राहतो. पती-पत्नीचा पगार ही आपली आवक आहे, होणारा खर्च जावक आहे. यासाठी जे मॅनेजमेंट करतो तसेच राज्याचा अर्थसंकल्पातही केला जातो. फक्त राज्याला व्यापक स्वरुपात हे काम करावं लागतं. बजेटबद्दल जी भीती असते ती दूर होण्यासाठी या पुस्तकामुळे मदत होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे याकरिता हे पुस्तक लिहिलं आहे. जास्तीत जास्त ४० मिनिटांत हे पुस्तक वाचून पूर्ण व्हायला पाहिजे हे मी ठरवलं होतं. अलीकडेच जीडीपी ग्रोथ प्रचलित शब्द झाला आहे. पण या शब्दाचा अर्थ काय हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक सांगू शकत नाही. देशात आणि राज्यात एखाद्या वस्तूची निर्मिती होते त्याची एकत्रित किंमत म्हणजे जीडीपी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी किती वाढ झाली त्याला जीडीपी ग्रोथ म्हणतात असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करु
फडणवीस हे चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व २८८ आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू, म्हणजे आम्हाला सुगीचे दिवस येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी दिल्लीत बोलावे. फडणवीस दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटीवार अधिक खूश होतील, असा चिमटा काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खसखस पिकविली.
देवेंद्रजी तुम्ही लिहित राहा
देवेंद्रजी! विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही पुढची पाचदहा वर्षे असेच पुस्तक लिहीत राहा म्हणजे आम्हाला आमच्या उणिवा कळतील व आम्ही पुढे जात राहू अशी कोपरखळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढली तसेच अतिशय सोप्या भाषेत अर्थसंकल्प म्हणजे काय हे सांगणारे मराठीतील पहिले पुस्तक लिहिले हे प्रशंसनीय असल्याचं कौतुकही केले.