राजीनामा ते माफीनामा : काकांनी कांडी फिरवली की दादा जिंकले?
By यदू जोशी | Published: September 29, 2019 06:27 AM2019-09-29T06:27:52+5:302019-09-29T06:28:23+5:30
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा कुणालाही न सांगता देत बंडच केले होते पण काका शरद पवार यांनी २२ तासांत अशी काही कांडी फिरवली की ‘काकांचाच शब्द माझ्यासाठी अंतिम आहे, मी त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही’ असे सांगत अजितदादांनी पत्र परिषदेत माफीनामाच सादर केला.
- यदु जोशी
मुंबई : अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा कुणालाही न सांगता देत बंडच केले होते पण काका शरद पवार यांनी २२ तासांत अशी काही कांडी फिरवली की ‘काकांचाच शब्द माझ्यासाठी अंतिम आहे, मी त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही’ असे सांगत अजितदादांनी पत्र परिषदेत माफीनामाच सादर केला.
२२ तासांत असे काय घडले की अजित पवार शांत झाले, काकांच्या चरणी गेले आणि एवढेच नव्हे तर जे काका काल बोलले त्याचीच री त्यांनी पत्रपरिषदेत ओढली? शेवटी गुरू तो गुरूच असतो हे काकांनी सिद्ध केले असे दिसते. मात्र, दीड दोन तासांच्या बंदद्वार बैठकीत अजित पवार यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत काही अटी काकांकडून मंजूर करवून घेतल्या आणि मगच बंडाची तलवार म्यान केली, अशी त्याची दुसरी बाजूदेखील असू शकते. कारण, आपल्यातील बंड थंड करताना बिनशर्त शरण जाणे अजित पवारांच्या स्वभावात बसणारे नाही, असे त्यांचे निकटस्थ सांगतात.
पक्षात यापुढे सन्मानाने स्थान दिले जाईल, राष्ट्रवादीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना विश्वासात घेतले जाईल, कुटुंबातील सदस्यांबाबत निर्णय घेतानाही विश्वासात घेतले जाईल, या अजित पवार यांच्या अटी शरद पवार मान्य केल्या, असे खात्रीलायकरीत्या समजते. त्यामुळे ही एकतर्फी युद्धबंदी नाही तर तहच होता, असे म्हणायला जागा आहे. त्या तहाचे परिणाम, पडसाद नजीकच्या काळात दिसतील, अशी अपेक्षा आहे.
‘माझ्यावरील ईडीच्या कारवाईने व्यथित होऊन अजित पवार यांनी राजीनामा दिला’ असे शरद पवार यांनी काल रात्री पुण्यात पत्र परिषदेत बोलताना सांगितले होते. पवारांनी जे काही म्हटले तीच ‘लाइन’ घेऊन अजितदादा बोलतील की ते बंडाचे निशाण फडकवतील या बाबत प्रचंड उत्सुकता होती. हायहोल्टेज पत्रपरिषदेत बोलताना अजितदादांनी काकांची भूमिका नुसती पुढेच नेली नाही तर त्याला जबरदस्त भावनिक टचही दिला. त्यांना अश्रू अनावर झाले.
शिवसेनेने ईडीच्या कारवाईबाबत पवारांची पाठराखण केलेली असताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे काका-पुतण्याच्या बैठकीनंतर शरद पवार यांना जाऊन भेटले. ‘वैयक्तिक संबंधातून मी पवारांना भेटायला आलो, त्याचा राजकारणाशी संबंध नाही’, असे राऊत म्हणाले खरे पण या भेटीने या घडीला शिवसेना पवारांसोबत असल्याचे चित्र त्या निमित्ताने समोर आले.
चाणाक्ष पवारसाहेब
एकूणच २२ दिवसांसाठी उरलेली आमदारकी अजित पवार यांनी तडकाफडकी सोडली ती पक्ष व कुटुंबातील कलहामुळे नव्हे तर काकांवर या वयात होत असलेल्या आरोपांनी व्यथित होऊन सोडली हे भासविण्यात चाणाक्ष पवारसाहेबांना यश आले. कलह, बंडाकडे जाऊ पाहणारा राजीनामा आणि त्यानंतरचा घटनाक्रम त्यांनी अतिशय कौशल्याने पक्ष व स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण होईल, अशा पद्धतीने वळवून दाखविला. पुतण्याच्या काही अटी त्यांनी निश्चितच मान्य केल्या असतील पण राजीनाम्याचा प्रवास माफीनाम्याकडे करण्यात त्यांनी यश मिळवून दाखविले. कुटुंबात आपल्या शब्दाबाहेर कोणीही नाही हेही सिद्ध केले.