रिचर्डसन क्रुडासची जागा जे. जे. ला द्या; राहुल नार्वेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 11:14 AM2022-12-15T11:14:46+5:302022-12-15T11:15:04+5:30
सध्याच्या घडीला टाटा हे एकमेव कॅन्सरचे रुग्णालय मुंबईत आहे. देशभरातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा येथील जे. जे. रुग्णालयाशेजारी असणारी रिचर्डसन क्रुडास या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील कंपनीची जागा जे. जे. रुग्णालयाला अत्याधुनिक कॅन्सरचे इन्स्टिट्यूट उभारण्याकरिता हस्तांतरित करावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बुधवारी केली. नार्वेकर यांनी पंतप्रधान कार्यालयात मोदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले.
सध्याच्या घडीला टाटा हे एकमेव कॅन्सरचे रुग्णालय मुंबईत आहे. देशभरातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. गरीब रुग्णांनाही टाटा हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या रुग्णालयातील सेवासुविधांवर ताण येतो. या सर्व पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी पंतप्रधानांना या मागणी संदर्भातील सविस्तर निवेदन पत्राद्वारे दिले.
निवेदनात काय?
कर्करुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची कमतरता लक्षात घेऊन जे. जे. रुग्णालयाचा कॅन्सरचे रुग्णालय बांधण्याचा विचार प्रस्तावित आहे.
त्यासाठी रुग्णालयाशेजारील रिचर्डसन क्रुडास कंपनीची ४७,२४१. १७ स्क्वेअर मीटर ही एकमेव जागा उपलब्ध आहे. ती जागा केंद्र शासनाच्या अवजड उद्योग या मंत्रालयाच्या अखत्यारित येते. ही जागा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेकदा प्रयत्न केले.
कॅन्सरच्या रुग्णालयाची कमतरता पाहता कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करून अवजड उद्योग मंत्रालयाकडून ही जमीन जे. जे. रुग्णालयाला द्यावी.