दक्षिण मुंबईत उमेदवारांमध्ये रंगू लागल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:02 AM2019-04-25T02:02:30+5:302019-04-25T02:05:24+5:30
दक्षिण मुंबईत असाच वाद शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगत असून मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तस तसे या तू तू मैं मैं मध्ये वाढ होत चालली आहे.
मुंबई : निवडणुकीच्या मैदानात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मात देण्यासाठी अनेक प्रयत्न होतात. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फेºया झडतात आणि चक्क उमेदवारांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. दक्षिण मुंबईत असाच वाद शिवसेना-काँग्रेसमध्ये रंगत असून मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तस तसे या तू तू मैं मैं मध्ये वाढ होत चालली आहे.
दक्षिण मुंबईत गुजरात आणि जैन मतदार मोठ्या संख्येने आहेत. भाजपबरोबर युती झाल्यामुळे ही मतं शिवसेनेच्या बाजुने वळली आहेत. मात्र या मतदारसंघात मराठी लोकसंख्येबरोबरचं अमराठी मतदारांची संख्याही अधिक आहे. मराठी मताच्या जोडीने अमराठी मतं शिवसेनेची ताकद वाढवेल. हा धोका टाळण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्तीपणाला लावली आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेने काही वर्षांपूर्वी मांस शिजविल्याच्या मिलिंद देवरा यांच्या विधानापासून उभय पक्षांमध्ये वाद रंगला आहे.
जैन मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने शिवसेनेने देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याची दखल घेऊन आयोगानेही देवरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे देवरा यांनी आता अरविंद सावंत यांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी, असे आवाहन करुन त्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. सावंत यांच्यावर जामीनपात्र वॉरंट काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर उमटत आहे.
चर्चासत्र नव्हे पार्टीच...
काँग्रेसचा हा हल्ला परतून लावण्यासाठी मानहानीचा दावा, निवडणूक आयोगाकडून कारवाईची मागणी असा सपाटा शिवसेनेनेही लावला आहे. निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात येत असल्याचा नवा आरोप देवरा यांनी केला आहे. कुलाबा, रेडिओ क्लब येथे आयोजित चर्चासत्रात युतीची पार्टी रंगल्याचे त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.