जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:15 PM2024-01-05T13:15:59+5:302024-01-05T13:18:29+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यावर वर्षभरात होणाऱ्या खानपान सेवेसाठीच्या खर्चाची माहिती समोर आली आहे.
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या बंगल्यावर वर्षभरात होणाऱ्या खानपान सेवेसाठीच्या खर्चाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर अन्न व पेये पुरवण्यासाठी राज्य सरकारने केटरर्सची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर दीड कोटी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर वार्षिक दीड कोटी खर्च करुन केटरची नियुक्ती केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे तिन्ही निवासस्थानांसाठी एकूण खानपान खर्च अंदाजे दर वर्षी ६.५ कोटी रुपये येणार आहे.
एप्रिल २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरील खापानाच्या खर्चावरुन टीका केली होती. राज्यात शिंदे-फडमवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालय आणि सरकारी निवासस्थानांवर गर्दी होत होती, याचा सरकारी तिजोरीवर परिणाम होत असल्याचे म्हटले जात होते. आरटीआयच्या माहितीनुसार, सरकार स्थापन झाल्यानंतर चार महिन्यात वर्षा बंगल्यावर केटरींग सेवेवर २ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले होते.
राज्य सरकारने एप्रिल २०२५ पर्यंत अजित पवारांचे शासकीय निवासस्थान देवगिरीसाठी छत्रधारी केटरर्सची नियुक्ती केली आहे. आता, वर्षा, सागर आणि देवगिरी या तिन्ही निवासस्थानांवर खानपानाचा एकूण खर्च दरवर्षी सुमारे ६.५ कोटी रुपये येईल. एप्रिल २०२३ मध्ये, अजित पवार यांनी वर्षा येथे अन्न आणि पेय बिल अवघ्या चार महिन्यांत तब्बल २.६८ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा आरोप केला होता.
या वस्तू पुरवणार
गेल्या वर्षी, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शिंदे आणि फडणवीस यांच्या निवासस्थानी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन केटरर्स-छत्रधारी केटरर्स आणि श्री सुख सागर हॉस्पिटॅलिटी-ची नियुक्ती करणारा सरकारी ठराव जारी केला होता. ऑर्डरचा एक भाग म्हणून, देवगिरी येथील केटरर ४४ नियमित वस्तू प्रदान करेल ज्यात गरम आणि थंड पेये आणि स्नॅक्सचा समावेश आहे जसे की महाराष्ट्रीयन कचोरी (१५ रुपये), साबुदाणा वडा (१५ रुपये), दही वडा (१५ रुपये), दक्षिण भारतीय पदार्थ जसे की वडा सांभर आणि टोमॅटो ऑम्लेट (२८ रुपये), मसाला डोसा (२० रुपये) आणि शाकाहारी आणि चिकन सँडविच (१८-२० रुपये). या स्नॅक्स व्यतिरिक्त, केटरर्स पाहुण्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी थाळी (७५ आणि ९८ रुपये), शाकाहारी आणि मांसाहारी चिकन आणि मटण बिर्याणी (२५ आणि ३५ रुपये) आणि बुफे (१६० रुपये) देतील.
या यादीत फ्रूट सॅलड (१५ रुपये) देखील समाविष्ट आहे. वर्षा आणि सागर येथे समान दर लागू आहेत. ठराविक दिवशी, केटरर्स व्हीआयपी स्पेशल स्नॅक्स (४० रुपये), स्पेशल मिक्स्ड फ्रूट्स बास्केट (२० रुपये), स्पेशल व्हेजिटेरियन हाय टी बुफे (१०० रुपये), उकडीचे मोदक (१५ रुपये प्रति नग) आणि काजू मोदक (१८ रुपये) देखील देतात. “जर अन्नधान्य मान्य केलेल्या दरांव्यतिरिक्त अन्य दराने विकले जात असेल, तर त्यासाठीचे पैसे मंजूर केले जाणार नाहीत,असंही जीआरमध्ये नमूद केले आहे.