'Corona बाबत अफवा पसरवल्या जाताहेत'; अजितदादा धावले शेतकऱ्यांच्या मदतीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:20 AM2020-03-11T10:20:43+5:302020-03-11T15:43:55+5:30
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे
मुंबई - पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच, लोकांपर्यंत योग्य तो मेसेज पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना होत नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे पुण्यात पाच संशयित रूग्ण आढळून आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री केली. त्यानंतर, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेऊन याबाबत माहिती दिली. कुणीही घाबरण्याचे कारण नसून योग्य ती खरबदारी घेण्याचं आवाहन दोन्ही मंत्र्यांनी केलं आहे. तसेच, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोनासंदर्भात योग्य प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.
कोरोनासंदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. पण, चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही, असे स्वत: अजित पवार यांनी सांगितले. तसेच, कोरोनासंदर्भात सरकारकडून एक मेसेज देण्यात आला आहे, तो जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलवर पोहोचला पाहिजे. आपण, तो मेसेज व्हायरला करावा. त्यामुळे, कोरोनासंदर्भातील अफवा दूर होतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील चिकन मार्केट असोसिएशन अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Corona Virus: पुणे जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दरम्यान, पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात राहणारे हे दाम्पत्य जगभ्रमंतीवर गेले होते. त्यांच्यासोबत आणखी ४० सह प्रवासी होते. हे दाम्पत्य दुबईहून विमानाने १ मार्च रोजी मुंबईला आले. तेथून कॅबमधून ते पुण्याला आले. यातील पुरुषाला ताप आल्यानंतर त्रास जाणवू लागल्यावर केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांची मुलगी, मुलगा आणि मुंबईहून त्यांना घेऊन आलेल्या कॅब चालकाची तपासणी करण्यात आली. या अहवालामध्ये मुलगी आणि चालकामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. मुलामध्ये अद्याप ही लक्षणे दिसलेली नाहीत. या दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यासोबत विमानामधून प्रवास केलेला एक सहप्रवासीसुद्धा कोरोनाबाधित असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.