Rupali Patil Thombare: रुपालीताई धडाकेबाज, आज फक्त त्याच पक्षात आल्यात, पण...; अजित पवारांचं सूतोवाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 01:33 PM2021-12-16T13:33:10+5:302021-12-16T13:34:11+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare Joining NCP) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पक्षाच्या महिला आघाडीला बळ मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"रुपालीताई धडाकेबाज आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा आमच्या पक्षाला १०० टक्के फायदा होईल यात शंका नाही. पुणे भागात त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांचं नाव लौकिक आहे. आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला असला तरी येत्या काळात पक्षाकडून आणखी मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहे", असं सूतोवाच अजित पवार यांनी यावेळी केलं आहे.
मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
रुपाली पाटील यांनी आज ट्विट करत महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यात रुपाली पाटील यांनी शरद पवारांच्या नेतृत्त्वाचं कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष प्रवेशाची संधी दिल्याचे आभार व्यक्त केले होते. "आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार...", असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं होतं.
कोण आहेत रुपाली पाटील ठोंबरे?
रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली होती. अलीकडेच त्यांची शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करत राज्य उपाध्यक्ष पद दिले होते. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.