Russia-Ukraine Conflict: “कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:29 AM2022-02-27T06:29:04+5:302022-02-27T06:30:09+5:30
प्रियल भानुशालीने व्हिडिओ व्हायरल करत मदतीचे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सतत सुरू असलेला गोळीबार, त्यात कधीही, कुठेही बॉम्ब पडू शकतो... या भीतीने गेल्या तीन दिवसांपासून झोपच उडाल्याचे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनी प्रियल भानुशाली हिने सांगितले. तसेच व्हिडिओ व्हायरल करत मदतीचे आवाहन केले आहे.
मुलुंड परिसरात राहणारी प्रियल भानुशाली युक्रेनच्या ओडेस्सामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे. प्रियल सांगते, सध्या सगळीकडे गोळीबार सुरू आहे. किव्हमध्ये मित्राच्या डोळ्यांदेखत, विद्यापीठ उद्ध्वस्त केले. अद्याप सामान्य नागरिकांवर हल्ले केले नाही, असे म्हटले जात आहे.
मात्र, हल्ल्यादरम्यान काहीही बघितले जात नाही. कधीही सायरन वाजतो. सायरन वाजल्यास तत्काळ बंकरमध्ये जाण्याच्या सूचना दिल्या जातात. गेल्या तीन दिवसांपासून झोपलो नाही. कधी कुठून आपल्यावर बॉम्ब पडेल या भीतीने झोप उडाली आहे. दूतावासाकडूनही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आम्हाला वाचवा. आम्हाला घरी यायचे आहे, असे सांगताना तिला अश्रू अनावर झाले. दुसरीकडे तिची आई काजल यांनीदेखील मुलीला लवकरात लवकर सुखरूप घरी पोहोचवण्याबाबत आवाहन केले आहे.