Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा; युक्रेन सोडताना मरणयातना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:24 AM2022-03-03T06:24:00+5:302022-03-03T06:24:33+5:30

Russia-Ukraine Conflict: पोलंडमध्ये जाताना युक्रेनकडून भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला.

russia ukraine conflict indian students beaten with sticks tear gas | Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा; युक्रेन सोडताना मरणयातना 

Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा; युक्रेन सोडताना मरणयातना 

Next

विनय उपासनी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना तो देश सोडताना मरणयातना सहन कराव्या लागत असून, पोलंडमध्ये जाताना युक्रेनकडून भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्यांच्यावर युक्रेनच्या लष्कराने अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हालअपेष्टा सहन केलेल्या विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने थेट संवाद साधला.

भारतात परतण्यास अडचणी येऊ नयेत आणि घरच्यांना वाईट वाटू नये, यासाठी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला त्यांनी सांगितले की, ‘आम्ही १००-१५० किमी अंतर पार करून युक्रेनच्या सीमेपर्यंत आलो. मात्र, युक्रेनच्या बाजूने आम्हाला सीमा पार करूच दिली जात नव्हती. निघताना आमच्याजवळ अनेक बॅगा होत्या. परंतु कडाक्याची थंडी आणि पुरेशा अन्नाच्या अभावामुळे आम्ही आवश्यक तेवढेच सामान जवळ ठेवले. बाकीचे वाटेत फेकून दिले.’

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांची त्रेधा उडाली. अनेकांचा युक्रेनच्या सीमेपर्यंतचा प्रवास भयावह होता. हा अनुभव आला ल्विव आणि कीव्ह शहरातील विद्यार्थ्यांना. युक्रेन सीमेवरून पोलंडमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागली. पोलंडच्या वॉर्सा शहरात आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव ‘लोकमत’ला सांगितला. तब्बल १०० ते १५० किमी अंतर पायी कापत आलो. काही अंतर टॅक्सी वा खासगी गाड्या पकडून पार केले. रेल्वेगाड्या तर काही मिनिटांत फुल्ल होत होत्या. त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. रशिया युक्रेनवर हल्ला करणारच नाही, असाच सर्वांना विश्वास होता. त्यामुळे आमच्यातील अनेकजण गाफील राहिले, अशी कबुलीही या विद्यार्थ्यांनी दिली.

पोलंडकडून व्यवस्था

युक्रेनमधून आश्रयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलंड सरकारने वॉर्सामध्ये चांगली व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, गरम पाणी, खाण्याचे पदार्थ, औषधे याबरोबरच १५ दिवसांचा व्हिसाही देण्यात आला आहे. पुरेशा विश्रांतीनंतर भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांचे विद्यार्थी बस वा विमानाने बर्लिन येथे जात आहेत. वॉर्सातील एका गुरुद्वारात ८० भारतीयांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी त्यांची भेट घेऊन वास्तपुस्त केली.

सीमेवर राहावे लागले तिष्ठत

सीमेपलीकडे जाण्यासाठी युक्रेनी नागरिकांना प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे आम्हाला कित्येक तास सीमेवर तिष्ठत राहावे लागत होते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

भारत-पाक विद्यार्थी भाई-भाई

पोलंडच्या सीमेवर युक्रेनच्या लष्कराने कोंडी केल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी प्रतिकार मोडून काढत युक्रेन सीमेवरून पोलंडमध्ये प्रवेश केला.

Web Title: russia ukraine conflict indian students beaten with sticks tear gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.