“घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 07:22 AM2022-02-27T07:22:09+5:302022-02-27T07:23:07+5:30
युक्रेनमध्ये अडकलेल्या गोरेगावच्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी ‘लोकमत’ने साधला संवाद
गौरी टेंबकर – कलगूटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मी राहतेय तिथून अवघ्या १० ते १५ किलोमीटर परिसरात बॉम्बस्फोट होत आहेत, मिसाइल पडत आहेत, आयुष्य अलार्मवर अवलंबून आहे’, अशी माझी बहीण मला सांगतेय. आधी कोरोना आणि आता दोन देशातील युद्धाने तिला आमच्यापासून दूर केलेय, तिला पाहता येईल की नाही, याची अजूनही शाश्वती नाही’, असे सांगताना गोरेगावमधील जॉन्सन एबेंझर या लॉच्या विद्यार्थ्याचा कंठ दाटून आला. त्याची बहीण क्रेनाप कृपाकरण ही एमबीबीएसची विद्यार्थिनी युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये अडकली आहे.
लॉच्या शेवटच्या वर्गात शिकणारा जॉन्सन गोरेगावच्या भगतसिंगनगर येथे आई, वडील, तसेच बहिणीसोबत राहतो. त्यांची बहीण क्रेनाप ही पाच वर्षांपूर्वी उच्चशिक्षणासाठी युक्रेनच्या खरकीव येथे गेली. ‘ती कोरोना लॉकडाऊनच्या आधी एकदा आम्हाला भेटली. त्यानंतर दोन वर्षे आमची भेट झाली नाही. ती सध्या एमबीबीएसच्या शेवटच्या वर्गात शिकत आहे’, असे तिच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
‘युद्ध सुरू झाल्यानंतर आमच्या आई- वडिलांची अवस्था वाईट झाली आहे. मी रोज सकाळी त्यांचे क्रेनापसोबत बोलणे करून देतो. त्यानंतर सतत तिच्या संपर्कात असतो. ती राहत आहे त्या खासगी फ्लॅटपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर बॉम्ब पडत आहेत. मिसाइल सुटत आहेत. अलार्म आमच्या आयुष्याची सगळी सूत्रे हाताळत आहे. तो वाजला की मेट्रोसारख्या छुप्या ठिकाणी, बॉम्ब कव्हर असलेल्या ठिकाणी पळायचे, बंद झाले की परतायचे, अशी अवस्था झाल्याचे ती सांगते’, असे जॉन्सनने ‘लोकमत’ला सांगितले. मी तिला धीर देतो; पण ज्या परिस्थितीचे तिने वर्णन केले तिथे पुढच्या क्षणी काय असेल? या विचाराने मी अस्वस्थ होतो.