Param Bir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग स्वत:च्याच जाळ्यात अडकणार? हायकोर्टात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:23 AM2021-07-10T10:23:46+5:302021-07-10T10:26:05+5:30
मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टीप्पणी केली आहे त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात.
मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Param Bir Singh) यांच्या तक्रारीवरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या. गेल्या ३ महिन्यापासून सीबीआय अनिल देशमुखांची(Anil Deshmukh) चौकशी करत आहे. आता परमबीर सिंगही सीबीआयच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई हायकोर्टात(Mumbai Highcourt) झालेल्या सुनावणीनंतर परमबीर सिंग यांच्यावरही CBI चौकशीची टांगती तलवार असणार आहे.
मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टीप्पणी केली आहे त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. पोलीस प्रशासन प्रमुख असलेले ते निर्दोष आहेत असा दावा करू शकत नाही. कारण तेदेखील यात समान जबाबदार आहेत. सचिन वाझेला १६ वर्षाच्या निलंबन कालावधीनंतर पुन्हा पोलीस सेवेत घेण्यावरून हायकोर्टाने हे विधान केले आहे. कोणताही प्रशासन प्रमुख केवळ सत्ताधाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत होतो हे सांगून स्वत: निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
प्रशासनाचा प्रमुखही तितकाच जबाबदार आहे. असंही असू शकतं की, मंत्र्याने सचिन वाझेला पुन्हा घेण्याचे आदेश दिले असावेत. परंतु उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याच्या कर्तव्याचे पालन न करता फक्त आदेशाचं पालन करू शकतो का? आम्हाला अपेक्षा आहे की, सीबीआय त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवेल. CBI या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून यातील मुख्य दोषी कोण आहेत याचा शोध घेतील अशी आमची अपेक्षा आहे असं हायकोर्टाचे न्यायाधीश शिंदे यांनी सांगितले.
१०० कोटी वसुलीच्या आरोपावरून खळबळ
परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. यात मंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेवर १०० कोटी वसुलीसाठी दबाव टाकला होता असा आरोप करण्यात आला. त्यानंतर मुंबई हायकोर्टात हे प्रकरण गेले. हायकोर्टाच्या आदेशावरून या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली. त्यानंतर ईडीनेही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली. ज्यात सचिन वाझेचं जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवण्यात आला. सीबीआयनेही सचिन वाझेचे स्टेटमेंट घेतले आहे.
...माने आणि शर्मा यांनी घेतलं नाव?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी NIA चौकशी सुरू आहे. एनआयएने परमबीर सिंग यांचाही जबाब नोंदवला आहे. परंतु आतापर्यंत या प्रकरणात त्यांना आरोपी बनवण्यात आलं नाही. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानुसार, जेव्हा परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला तोपर्यंत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील माने आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाली नव्हती. सुनील माने आणि प्रदीप शर्मा यांनी परमबीर सिंग यांचे नाव घेतले का? याबाबत अधिकृत माहिती नाही. परंतु जोपर्यंत यात आरोपपत्र दाखल होत नाही तोवर परमबीर सिंग यांच्या मनात धाकधुक कायम आहे.
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांकडून परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. येणाऱ्या काही दिवसांत परमबीर सिंग यांच्याविरोधात मोठी कायदेशीर कारवाई झाली तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही असं मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कारण सचिन वाझे थेट परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करायचे? ही गोष्ट कोणापासून लपून राहिली नाही.