रॅलीतील भगव्या झेंड्यावरुन राष्ट्रवादीत दुमत, शरद पवारांचं वेगळंच मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 04:20 PM2019-09-16T16:20:39+5:302019-09-16T16:23:32+5:30
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या झेड्यांबरोबरच आता छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फडकावण्याचा आदेश अजित पवारांनी दिला होता. शिवसेना-भाजपाच्या शिवप्रेमाला आणि भगव्या झेंड्याच्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच हिणवले. त्यामुळेच भाजप-शिवसेनेच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या राष्ट्रवादीच्या या नव्या भगवेकरणावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. आता, या भगव्या झेंड्याच्या निर्णयावरुन खुद्द शरद पवारांनीचअजित पवारांना लक्ष्य केलं आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने घेतलेली ही भूमिका राजकीय असल्याची टीका सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मात्र हा निर्णय देर आये, दुरुस्त आये, असा वाटतो आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी स्वत: या संदर्भात जाहीर आदेश दिला असला तरी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संदर्भात कोणतीच भूमिका जाहीर केलेली नव्हती. अखेर मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना पवारांनी याबाबत मौन सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅली आणि सभांमधील भगव्या झेंड्याबद्दल शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये किंवा रॅलींमध्ये भगवा झेंडा वापरण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून तो अजित पवार यांचा आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, अजित पवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्रातील पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. पण, पवार यांनी त्यांच्या भगवा झेंड्याच्या निर्णयाचे समर्थन न करता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, पक्षाचा त्याच्याशी संबंध नसल्याचं म्हटलंय.
दरम्यान, पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ''लोकमत'' ला सांगितले होते की, शिवाजी महाराज व भगवा झेंडा हा केवळ शिवसेनेचाच आहे असा समज चुकीचा असून, तो भागवत संप्रदायाचा भगवा झेंडा आहे. त्या भगव्याच्या पाठीमागे एक श्रद्धा व आत्मियता आहे. याच आत्मयितेने या झेंड्याचा स्विकार केला गेला आहे. इतक्या दिवस आम्ही हा झेंडा वापरला नाही, असे काही नाही़ सध्याच्या परिस्थिती शिवसेनेकडून आम्हीच केवळ या भगव्याचे वारस असल्याचे भासविले जाते ते चुकीचे असून, भगव्याच्या प्रती आदर व छत्रपतींची अस्मिता आमच्यातही ठासून भरली आहे. केवळ त्याचे प्रदर्शन कधी केले नाही. सध्याच्या परिस्थितीत सेना व भाजपचा ज्याप्रकारे राजकारण करीत आहे. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी केवळ मनातील या सुप्त भावना या भगव्या झेंड्याच्या माध्यमातून आम्ही मांडल्या आहेत.