पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही; संभाजीराजेंचा गैरसमज झालाय- सचिन सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:11 PM2022-05-27T13:11:03+5:302022-05-27T13:18:33+5:30
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.
मुंबई- शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा, आम्ही उद्या लगेच तुमचं नाव जाहीर करु, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. शिवसेनेबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. पण मला कोणत्याही बंधनात अडकायचं नाही, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. तसेच घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी राज्यसभेची निवडणूक लढवणार, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. तसेच ही माझी माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचंही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
संभाजीराजेंच्या या विधानावर आता काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे आमदार कोणाला मतदान करतो आहे, हे आपल्या पक्षप्रतिनिधीला दाखवून मतदान करतात त्यामुळे पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही. आदरणीय संभाजीराजे छत्रपती यांचा गैरसमज झाला असावा, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे आमदार कोणाला मतदान करतो आहे हे आपल्या पक्षप्रतिनिधीला दाखवून मतदान करतात त्यामुळे पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही. आदरणीय संभाजीराजे छत्रपती यांचा गैरसमज झाला असावा.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 27, 2022
दरम्यान, राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. राज्यभरात दौरे करून संघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
१० जूनला राज्यसभेची निवडणूक-
विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.