काँग्रेसचे संजय निरुपम अशोक चव्हाणांच्या भेटीला; बावनकुळेंची सूचक कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:04 PM2024-03-13T13:04:35+5:302024-03-13T13:36:17+5:30
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मात्र, शिवसेना उबाठा पक्षाकडून दोन जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने महाविकास आघाडीत खटका उडाला आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला बाय केल्यानंतर भाजपाचं कमळ हाती घेतलं. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत त्यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत अब की बार, ४०० पार चा नाराही दिला. त्यानंतर, आता ते भाजपात चांगलेच सक्रीय झाले असून काँग्रेसमधील नेत्यांना आपल्यासोबत भाजपात घेत असल्याचं दिसून येत आहे. माजी मंत्री आणि विदर्भातील काँग्रेस नेते पद्माकर दळवी यांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तर, माजी आमदार आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मात्र, शिवसेना उबाठा पक्षाकडून दोन जागांवर उमेदवार घोषित करण्यात आल्याने महाविकास आघाडीत खटका उडाला आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिवनंतर मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज झाल्याची चर्चा आहे, विशेष म्हणजे त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली. आता, निरुपम यांनी नुकतेच भाजपात गेलेले माजी काँग्रेस नेते व खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे, संजय निरुपम हेही भाजपात जातील काय, अशी चर्चा होत आहे. त्यातच, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय निरुपम यांच्याबद्दल सूचक विधान केलं आहे.
संजय निरुपम यांच्याशी आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. राजकीय नेत्यांची भेट घेणे, यात काही चुकीचे नाही. आम्ही पण विरोधी नेत्यांना भेटतो. पण, विकासासाठी कुणी आमच्यासोबत येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता संजय निरुपम हेही भाजपात जातील की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेनेतील प्रवेशाबाबत केला खुलासा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर नाराज झालेल्या निरुपम यांनी आज सकाळी सोशल मीडियाद्वारे आपली नाराजी जाहीर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचं तिकीट मिळावं, यासाठी संजय निरुपम यांचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मी प्रवेश करणार ही अफवा असून मी आता मालाड पूर्व येथे क्रिकेट स्पर्धेत आहे, असा खुलासाही निरुपम यांनी केला होता.