'एक तिकीट मागितलं तेही दिलं नाही... संजय निरुपम बंडाच्या तयारीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:51 PM2019-10-03T17:51:10+5:302019-10-03T19:19:34+5:30
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत.
मुंबई - काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनीही पक्षाला रामराम करत असल्याचे निर्देश दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मी पक्षाच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सहभाही होणार नाही, असे ट्विट निरुपम यांनी केले आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मी पक्षश्रेष्ठींकडे बोललो असून हा माझा अंतिम निर्णय असल्याचंही निरुपम यांनी म्हटलं आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. या तिन्ही यादीपर्यंत संजय निरुपम यांनी मुंबईतील एका जागेसाठी हट्ट धरला होता. मात्र, पक्षाकडून त्यांच्या शब्दाला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या संजय निरुपम यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये कुठलाही प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पक्षाच्या प्रचार अभियानातही मी सहभागी होणार नसल्याचे निरुपम यांनी सांगितले. निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. त्यामध्ये, मी पक्षाकडे मुंबई शहरासाठी एका जागेची मागणी केली होती. मात्र, काँग्रेसच्या तिनही याद्यांमध्ये निरुपम यांच्या शब्दाला मान देण्यात आला नाही. मी देलेली नावे नाकारण्यात आली आहेत. त्यामुळे कदाचित काँग्रेस पक्षाला माझं कामं, सेवा नको आहे, असेच मला वाटते. त्यामुळे मी पक्षाच्या प्रचार अभियानात सहभागी होणार नसल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टन येथील हाउडी मोदी या कार्यक्रमामधील भाषणाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखविणारे आहे. मिलिंद देवरांनी केलेल्या या ट्विटमुळे देवरा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. मिलिंद देवराच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं आहे. मोदींनी मिलिंद देवरांचे आभार मानत सांगितले की, दिवंगत मुरली देवरा यांनीही अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. या दोन्ही देशातील मजबूत संबंध पाहून ते आनंदी झाले असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले होते.