“राहुल गांधींचा देशात झंझावात, ‘I.N.D.I.A. को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:25 PM2023-08-31T12:25:11+5:302023-08-31T12:25:56+5:30
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व आहेत. २०२४ ला इंडिया जिंकणारच. विरोधक आम्हाला तोडू शकत नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला.
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपविरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक दोन दिवस मुंबईत होत आहे. या बैठकीतून केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत असून, इंडिया आघाडीला पराभूत करणे कुणाच्या बापाला शक्य नाही, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, युवा नेते राहुल गांधी यांच्या झंझावातामुळे देश बदलतोय, देशातील वातावरण बदलतेय. राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेतृत्व आहे. मोदींच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही देशभक्त इंडियाचे लोक एकत्र आलेलो आहोत. इंडिया को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हैं, कुणाच्या बापाला आमचा पराभव करणे शक्य नाही, असा एल्गार संजय राऊतांनी केला. तसेच इंडिया आघाडीच्या बैठका होतील तशी देशातील महागाई कमी होईल. सिलिंडरचे दर कमी झाले, हे त्याचेच उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांना इंडियाची भीती वाटत आहे, हे यातून सिद्ध झाले, असा दावाही संजय राऊतांनी केला.
विरोधक इंडिया तोडू शकत नाहीत, आम्ही इंडिया जिंकणारच
राष्ट्राच्या सुरक्षेसाठी देशभक्तीच्या धाग्यात आम्ही सगळे बांधलो गेलो आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद-मनभेद नाहीयेत. २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही इंडिया जिंकणारच हा आमचा निर्धार आहे. विरोधक आमचा इंडिया तोडू शकत नाहीत, असे संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महायुतीची बैठक वरळीत होत आहे. याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आले. महायुतीने वर्षावर बैठक घेऊ द्यात नाहीतर चंद्रावर बैठक घेऊ द्यात, इंडिया आघाडीचा पराभव करणे त्यांच्या बापाला शक्य होणार नाही. आम्ही एक आहोत आणि एकत्र राहणार, असा ठाम विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
संयोजक कोण? केजरीवाल-राहुल गांधींमध्ये रस्सीखेच आहे का?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यात संयोजकपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांचीही नावे आघाडीवर आहेत. इंडियाचा संयोजक कोण असेल, यावर बोलताना, नेत्यांमध्ये कोणतेही युद्ध नाही. सगळ्यांमध्ये सख्य आहे. राहिला प्रश्न राहुल गांधी यांचा तर ते देशाचे निर्विवाद नेतृत्व आहे. लोकांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यांच्या झंझावातामुळे देश बदलत आहे. देशातील वातावरण बदलत आहे. ज्या गोष्टींची चार भिंतींमध्ये चर्चा करायला हवी, ती गोष्ट आम्ही मीडियासमोर करणार नाही. हा आमच्या इंडियाचा पहिला नियम आहे. बैठकीत यावर चर्चा केली जाईल, असे संजय राऊत म्हणाले.